वणी तालुक्यातील अन्न, धान्य दक्षता समित्या कागदावरच
By Admin | Updated: May 9, 2014 01:18 IST2014-05-09T01:18:52+5:302014-05-09T01:18:52+5:30
तालुक्यातील रास्त भाव दुकान व केरोसिन विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या दक्षता समित्या केवळ कागदावरच दिसून येत आहे.

वणी तालुक्यातील अन्न, धान्य दक्षता समित्या कागदावरच
वणी : तालुक्यातील रास्त भाव दुकान व केरोसिन विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या दक्षता समित्या केवळ कागदावरच दिसून येत आहे.
तालुका व नगरपालिका पातळीवर अशी दक्षता समिती गठित झाली. आमदार या समितीचे अध्यक्ष आहेत. नगरपालिका पातळीवरील समितीत नगराध्यक्षांचा, तर तालुका पातळीवरील समितीत पंचायत समिती सभापतींचा समावेश आहे. गावपातळीवर या समितीचा अध्यक्ष संबंधित गावचा तलाठी असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती कार्य करते. मात्र तालुक्यातील गावांमधील जनतेला या समितीचा अध्यक्ष कोण आहे, समितीत किती सदस्यांचा समावेश आहे, याचीच माहिती नाही. काही गावांमध्ये तर संबंधित सदस्य असणार्यांनाच आपण सदस्य असल्याची माहिती नाही.
समितीच्या कामकाजाबाबतही सदस्य अनभिज्ञ असतात. त्यामुळे या समित्या केवळ कागदावरच गठित करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. समितीचा अध्यक्ष असलेला संबंधित तलाठीही याकडे कोणतेच लक्ष देत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात रास्त भाव दुकानदार व केरोसीन विक्रेते निर्धास्त झाले आहे. केरोसीन विक्रेते तर खुलेआमपणे जादा दराने ऑटो चालकांना रॉकेल विकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी दक्षता समिती असूनही ग्रामस्थांचा त्याचा लाभ होत नाही.
तालुक्यात अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती दिसून येते. दक्षता समित्या निष्क्रिीय असल्याने ग्रामस्थ थेट उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांकडे तक्रारी करतात. ग्रामस्थांच्या तक्रारींचे दक्षता समितीने गावातच निराकरण केल्यास हा प्रकार तेथेच संपुष्टात येऊ शकतो. मात्र या समित्या केवळ कागदावरच असल्याने तक्रारींचे प्रकार वाढले आहे. आता उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनीच या बाबतीत लक्ष घालून ग्रामीण, तालुका व नगरपालिका पातळीवरील दक्षता समित्या कार्यप्रवण करण्याची गरज निर्माण झाली. (कार्यालय प्रतिनिधी)