शब्द पाळा अन्यथा उग्र आंदोलन
By Admin | Updated: May 14, 2017 01:02 IST2017-05-14T01:02:03+5:302017-05-14T01:02:03+5:30
तूर खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची तूर विनाअट खरेदी करावी, या मागणीसाठी ‘प्रहार’तर्फे येथील बाजार

शब्द पाळा अन्यथा उग्र आंदोलन
डेरा आंदोलन : तूर खरेदीचे ‘प्रहार’ला लेखी आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तूर खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची तूर विनाअट खरेदी करावी, या मागणीसाठी ‘प्रहार’तर्फे येथील बाजार समितीत डेरा आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारपासून खरेदी करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु दिलेला शब्द पाळा अन्यथा उग्र आंदोलन करू, असा इशारा ‘प्रहार’तर्फे देण्यात आला आहे.
जिल्हा प्रमुख प्रमोद कुदळे यांच्या नेतृत्त्वात डेरा आंदोलन सुरू करण्यात आले होते. शनिवारी तहसीलदार सुधीर पवार, सहायक उपनिबंधक आंबिलकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून खरेदी सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. बाजार समितीमध्ये तूर आणताना शेतकऱ्यांना आता टोकनची गरज राहणार नाही, या निर्णयामुळे टोकन नसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद कुदळे, बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल देशमुख, सुरेश कथळे, खुशाल ठाकरे, पुरुषोत्तम इंगोले, गणेश बुटले, श्रीकांत काळे, अंकुश राजुरकर, अतुल कोमावार, रशिद मलनस व इतर शेतकरी उपस्थित होते.
आता प्रशासनाने सोमवारी खरेदी सुरू करावी. त्यांनी शब्द पाळला नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहारतर्फे प्रमोद कुदळे यांनी दिला.