राज्यात शेतासाठी धुके,थंडीचे व्यवस्थापन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:33 PM2018-12-17T12:33:15+5:302018-12-17T12:34:13+5:30

शेतीचा डॉक्टर : काही दिवसात थंडीसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे.

Fog and winter management are needed for the farming in the state | राज्यात शेतासाठी धुके,थंडीचे व्यवस्थापन गरजेचे

राज्यात शेतासाठी धुके,थंडीचे व्यवस्थापन गरजेचे

- डॉ. प्रमोद यादगिरवार (यवतमाळ)

राज्यात विविध ठिकाणी अलीकडे अनेक भागात पाऊस पडला, या पावसामुळे रात्रीपासून पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके संचारत असते. अशा प्रकारच्या धुक्यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. विशेषत: हिरव्या कपाशीवर, तुरीवर, फळझाडांवर जास्त परिणाम होतो. पाऊस पडून गेल्यावर काही दिवसात थंडीसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पिकांवर पोटॅशियमयुक्त खताची थोडीफार फवारणी केल्यास वातावरणातील लगेच बदलाच्या धक्क्यापासून बचाव होईल.

संध्याकाळी व पहाटेच्या वेळेस शेतात शेकोटी पेटवून धूर केल्यास धुके व थंडी यापासून होणाऱ्या नुकसानीला रोखता येईल. आभाळ आणि धुके असल्यास किडींची प्रजनन शक्ती व क्रियाशिलता वाढते. म्हणून तूर व हरभरा पिकात अळीच्या प्रादुर्भावाविषयी विशेष जागरूक राहणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी निंबोळी ५%  किंवा बाजारातील सीआयबी शिफारशीत अझॅडिरॅक्टीनची फवारणी केल्यास पिकावर किडीचे अंडी सोडणाऱ्या मादींना परावृत्त करता येईल, थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जमिनीवर पालापाचोळा, हिरव्या गवताचे आच्छादन टाकावे व हलके पाणी दिल्याससुद्धा फायदा होईल.

अळ््यांची तीव्रता जास्त आढळल्यास  म्हणजेच दोन अळ््या प्रतिमीटर इतकी असल्यास इमॅमेट्टीन बेंझोएट किंवा क्रोलट्रॉमीपॉल साडेतीन मिली प्रति दहा लिटर पाणी या किटकनाशकाची फवारणी करावी. शेतशिवारात पक्षीथांबे व कामगंध सापळे लावावेत. राज्यात या वातावरणामुळे हिरव्या अळींचा प्रादुर्भाव  हरभऱ्यावर जाणवत आहे. शेतकऱ्यांनी जागरूक राहून उपाययोजना करावी.

(लेखक हे यवतमाळ येथील मध्य विदर्भ विभागातील विभागीय कृषी संशोधन केंद्रामध्ये सहयोगी संचालक आहेत.)
 

Web Title: Fog and winter management are needed for the farming in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.