‘केम’ प्रकल्पात नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्या
By Admin | Updated: July 15, 2016 00:31 IST2016-07-15T00:31:04+5:302016-07-15T00:31:04+5:30
सामान्य जनता, शेतकरी व महिलांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाव्दारे (केम) जिल्ह्यात यशस्वी झाले आहे.

‘केम’ प्रकल्पात नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्या
अमरावती : सामान्य जनता, शेतकरी व महिलांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाव्दारे (केम) जिल्ह्यात यशस्वी झाले आहे. अशा लघु उद्योग व ग्रामोद्योगांचा दाखला देऊन पारंपारिक शेती पीक उत्पादनासोबतच इतर शेतीपूरक जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहीत व प्रवृत्त करावे. त्यांची आर्थिक स्थिती सबळ करण्यासाठी रोजगारक्षम नाविण्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्यात यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी येथे केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी ‘केम’ प्रकल्पामार्फत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी कुशल राठोड, केम प्रकल्पाचे अधिकारी सुर्वे, आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधीचे अधिकारी, सर रतन टाटा ट्रस्टचे अधिकारी तसेच केम प्रकल्पांतर्गत चौदाही तालुक्याचे तालुका समन्वयक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ तालुक्यात केमव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.
ना. पोटे म्हणाले की, कृषी उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नामध्ये योगदान देवून प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा, शाष्वत वैविध्यपूर्ण उत्पन्नाच्या स्त्रोतासह, कृषी व कृषित्तेर उत्पन्नाच्या साधनाव्दारे विकास करणे त्याचप्रमाणे उत्पादनातील व बाजपेठीय जोखीमींमुळे दारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे हा केम प्रकल्प निर्माण करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पांमध्ये आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधी व सर रतन टाटा ट्रस्ट यांच्याव्दारे संयुक्त पध्दतीने योजना राबाविण्यासाठी निधी दिला जातो. जिल्हयातील चौदा तालुक्यात विकासात्मक योजना राबविण्यासाठी १० क्लस्टरमध्ये सर रतन टाटा ट्रस्टमार्फत सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी केम प्रकल्पाला देण्यात आला आहे. यामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सिंचन सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टींग, शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाचे माकेर्टिंग, बचतगटाचे सबळीकरण, शेळीपालन, कुकुटपालन, ग्रामोद्योग व कुटीर उद्योग उभारणी, दालमिल-लघु उद्योग, शेती विषयक प्रशिक्षण आदी बाबींचा मुख्यत्वे समावेश आहे. शेतकऱ्यांची, बेरोजगार युवक तसेच महिलांनी केमव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. पोटे यांनी केले. कुठलेही अभियान राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सुध्दा सोबत ठेवावे. यामुळे नक्कीच लोक जुळेल व प्रकल्प यशस्वी होईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. केम प्रकल्पाद्वारे शेतकरी ग्रामस्थांना कसा न्याय मिळेल, याचे सुक्ष्म नियोजन करून रोजगारभिमुख उद्योगधंदे उभारण्याचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)