नोकरीपेक्षा व्यवसायावर भर द्या
By Admin | Updated: October 31, 2015 00:22 IST2015-10-31T00:22:07+5:302015-10-31T00:22:07+5:30
प्रत्येक समाजातील बांधवाने नोकरीपेक्षा आवडीचा व्यवसाय करावा. त्यातून प्रगती साधावी. काम करण्याची मानसिकता असलीच पाहिजे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

नोकरीपेक्षा व्यवसायावर भर द्या
संत नगाजी महाराज जयंती : आर्णीत मान्यवरांसह विद्यार्थ्यांचा सत्कार'
आर्णी : प्रत्येक समाजातील बांधवाने नोकरीपेक्षा आवडीचा व्यवसाय करावा. त्यातून प्रगती साधावी. काम करण्याची मानसिकता असलीच पाहिजे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
येथील श्रीसंत नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी २९ आॅक्टोबरला पार पडला. त्यावेळी अहीर बोलत होते. आमदार राजू तोडसाम यांनी सभामंडपासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी केले. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनीही मत व्यक्त केले. ते म्हणाले, संतांच्या विचारांना मनुष्याचे मन स्थिर राहते. समाजाने शिक्षणाला अधिक महत्त्व द्यावे. मंत्री असताना त्यांनी दहा लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यातून संत नगाजी महाराज मंदिरासह इतर बांधकाम करण्यात आले. यावेळी समाजातील मान्यवरांसह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष आरिज बेग म्हणाले, नगाजी महाराजांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषदेच्या माध्यमातून शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमदार ख्वाजा बेग म्हणाले, नगाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे. त्यांनी त्यांच्या कार्यातून समाजाला सकारात्मक दिशा दिली. नाभिक समाज तथा महाल संस्थेने रायगडावर जीवा महाले यांच्या पुतळ्याचे निर्माण करावे, अशी मागणी केली आहे. त्या मागणीचा आपण निश्चितच पाठपुरावा करू, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर उद्घाटक होते. अध्यक्ष म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू तोडसाम, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार, नगराध्यक्ष आरिज बेग, माजी नगराध्यक्ष अनिल आडे, सुधाकर चिठ्ठेकर, प्रकाश मादेश्वार, मनोज भुजाडे, सुरेश चिल्लरवार, डॉ.रमेश व्यवहारे, प्रा.निवृत्ती पिस्तुलकर उपस्थित होते. यावेळी नाभिक समाजाच्या महिला तथा पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आला. सूत्रसंचालन रेकलवार यांनी, प्रास्ताविक प्रा. निवृत्ती पिस्तुलकर यांनी केले, आभार सुधाकर चिठ्ठेकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)