बासरी वाजली... गाई घोंगड्यावर बसल्या...

By Admin | Updated: November 2, 2016 00:54 IST2016-11-02T00:54:32+5:302016-11-02T00:54:32+5:30

संगीत ही मनाची भाषा आहे. ती कुणालाही कळते. म्हणूनच अशिक्षित गुराख्याने वाजविलेली बासरी त्याच्या गायीला भावते.

The flute ... the cow sits on the hoarse ... | बासरी वाजली... गाई घोंगड्यावर बसल्या...

बासरी वाजली... गाई घोंगड्यावर बसल्या...

शेकडो वर्षांची परंपरा : तरोडा येथील गायगोधनाच्या कार्यक्रमात शेकडो गावकऱ्यांची हजेरी
शिवानंद लोहिया  हिवरी
संगीत ही मनाची भाषा आहे. ती कुणालाही कळते. म्हणूनच अशिक्षित गुराख्याने वाजविलेली बासरी त्याच्या गायीला भावते. बासरीच्या सूरांवर अन् डफड्याच्या तालावर गायी मंदिराच्या पायऱ्या चढून जातात... हा मनोज्ञ प्रकार दरवर्षी गायगोधनला तरोडा गावात घडतो. तसा तो यंदाही मंगळवारी घडला.
बासरी आणि डफडीच्या तालावर नाचणाऱ्या, बसणाऱ्या आणि मंदिरावर चढणाऱ्या गायींचा हा खेळ अचानक घडत नाही. त्यासाठी खास प्रशिक्षण होते. परिसरातील मांगूळ, तरोडा, गणगाव, साकूर, जवळा, खंडाळा, भांबराजा, वाई, बेलोरा, रूई, हिवरी, वाटखेड, मनपूर, शिरपूर, चाणी कामठवाडा यासह अनेक गावातील शेतकरी, गोपालक त्यात सहभागी असतात. ज्या गुराख्यांनी कधी शाळा पाहिली नाही, ती अशिक्षित माणसं गुरांना मात्र चोख प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणही कशाचे? तर भाषेचे. अन् भाषाही कोणती? तर मनाची ! बासरीने विशिष्ट सूर छेडले की बसायचे, डफडीवर खास थाप पडली की नाचायचे, हे मुक्या जनावरांना कळते. त्यामागे असते गुराख्यांनी घेतलेली मेहनत. अष्टमीपासून लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत गायींना प्रशिक्षण दिले जाते. गुराखी जेव्हा रानात गुरे चारायला नेतो, तेव्हा ते कुरणच प्रशिक्षण शिबिर बनते. हे प्रशिक्षण पाहण्यासाठी गावातील आणि आजूबाजूच्या गावातीलही हौशी गावकरी हजर होतात.
अशा तरबेज झालेल्या गायींची नजाकत तरोडा गावात गायगोधनाच्या दिवशी पाहता येते. मंगळवारी हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी तरोडा गावात मोठी गर्दी केली होती. गुराख्याच्या बासरीचा हुकूम मानणारी गाय, हे सख्य पाहताना गावकरीही हरखून गेले. ही शेकडो वर्षांची परंपरा येथे आजही जपली गेली आहे. मंगळवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रमिलाताई भेंडेकर, संस्थानचे अध्यक्ष शेषराव भलावी, सचिव राजाभाऊ भोयर, बबन गावंडे, सचिन भोयर, हेमेंद्र अवझाडे यांच्यासह विशेष अतिथी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी प्रशांत कांडलकर आदी उपस्थित होते. तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष देवानंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर सचिन भोयर यांनी आभार मानले.

Web Title: The flute ... the cow sits on the hoarse ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.