बांधकाम अभियंत्यांकडून झाडाझडती
By Admin | Updated: November 10, 2014 22:50 IST2014-11-10T22:50:04+5:302014-11-10T22:50:04+5:30
रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे धनोडा येथील पैनगंगेचा पूला धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रकाशित होताच बांधकाम आणि महसूल विभागात

बांधकाम अभियंत्यांकडून झाडाझडती
पैनगंगेचा धोकादायक पूल : बांधकाम आणि महसूल विभागात सारवासारव
ंमहागाव : रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे धनोडा येथील पैनगंगेचा पूला धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रकाशित होताच बांधकाम आणि महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली. पुसद येथे कार्यकारी अभियंत्यांनी तत्काळ बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच घटनास्थळावर जाऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले तर महसूल विभागानेही या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पथक निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पैनगंगेचा पूला खचण्याचा धोका निर्माण होऊनही महसूल आणि बांधकाम विभागाला याचा थांगपत्ता नव्हता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर संपूर्ण यंत्रणाच हादरुन गेली. पुसद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोपट खंडागळे यांनी तत्काळ बैठक घेतली. या बैठकीला उपविभागीय अभियंता महागाव, कनिष्ठ अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महागावचे उपविभागीय अभियंता प्रमोद खराबे यांना याबाबत खंडागळे यांनी जाब विचारला. सुरक्षा व दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाची असताना आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी का गेला नाही असा सवाल करीत चांगलीच झाडाझडती घेतली. संबंधित कनिष्ठ अभियंत्याने माहिती का दिली नाही. महसूल विभागाला हा गंभीर प्रकार का कळविला नाही, तसेच हा प्रकार एवढा गंभीर असतानाही पोलिसात तक्रार का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे या बैठकीला संबंधित कनिष्ठ अभियंता बी.डी. चिंचोले गैरहजर होते. नेहमी नॉट रिचेबल राहणाऱ्या या अभियंत्यावर कारवाईचे संकेतही पोपट खंडागळे यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणी घटनास्थळावर जाऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता प्रमोद दुधे यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.
बांधकाम विभागाप्रमाणेच महसूल विभागातही या वृत्ताने खळबळ उडाली. महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळेच तस्करांनी पुलाजवळ तेही पिल्लरजवळ खड्डे खोदले. यामुळे हा पूल खचण्याची भीती निर्माण झाली. या प्रकाराची गंभीर दखल उपजिल्हाधिकारी विकास माने यांनी घेतली. महसूल विभागाचे पथक तयार करून त्याची चौकशी केली जाणार आहे. तसेच रेती चोरीचाही आढावा घेण्यात येईल. दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती असून तस्करांंवरही फौजदारी कारवाईचे निर्देश दिले असल्याची माहिती आहे.
दरम्यान आज परिसरातील अनेकांनी या पुलाची झालेली अवस्था अगदी जवळून पाहिली. अनेक जण पुलाच्या खाली उतरुनही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत होते. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कधी लक्षच गेले नाही. या पुलाच्या डागडुजीसाठी आता सर्व उपाययोजना केल्या जाणार आहे. मात्र रेती तस्करांवर कसा अंकुश प्रशासन ठेवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)