रोषणाईचा झगमगाट, चायनीज लायटींग बाद

By Admin | Updated: October 9, 2016 00:22 IST2016-10-09T00:22:04+5:302016-10-09T00:22:04+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खात्मा करणारी सर्जिकल स्ट्राईक्स आणि चीनने घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे...

Flaming light, Chinese lighting later | रोषणाईचा झगमगाट, चायनीज लायटींग बाद

रोषणाईचा झगमगाट, चायनीज लायटींग बाद

सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम : भारतीय बनावटीच्या वस्तूंना पुसदमध्ये मागणी वाढली
पुसद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खात्मा करणारी सर्जिकल स्ट्राईक्स आणि चीनने घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे ऐन उत्सवाच्या काळात पुसदच्या बाजारपेठेने चायनीज वस्तूंना लांब केले आहे. त्यामुळेच स्वस्त असूनही चायनीज वस्तूंकडे पुसदच्या बाजारपेठेत पाठ फिरविली जात आहे. स्वत: विक्रेतेही ही बाब नाकारत नाही. चायनीज वस्तूंना नाकारल्याने बाजारपेठेत भारतीय बनावटीच्या लायटींगची मागणी वाढली आहे. वस्तू खरेदीसोबत देशाभिमान जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.
आकर्षक रोषणाई आणि मापक किमतीत मिळणाऱ्या चायनीज ईलेक्ट्रीक वस्तूंनी गेल्या १० वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व निर्माण केले होते. परिणामी भारतीय बनावटीची लायटींग हद्दपार होण्याच्या मार्गावर होती. कोणतीही गॅरंटी, वॉरंटी नसलेल्या परंतु २० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या चायनीज लायटींगला यंदा पुसदच्या नागरिकांनी नाकारले आहे.
सद्यस्थितीत पुसद शहर व परिसरात ईलेक्ट्रीक वस्तू विक्रीची चलती वाढली आहे. गणपती उत्सवात चायनीज वस्तूला उठाव होता. मात्र अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक्स करावे लागल्यानंतर चायनीज वस्तूला उतरती कळा लागली आहे. गेल्या १० वर्षानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाल्याचे विक्रेते सांगतात. गेल्या काही वर्षात बाजारपेठेतून हद्दपार झालेली भारतीय बनावटीची लायटींग यंदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाली आहे. केवळ लायटींग नव्हेतर विद्युत रोषणाईसाठी वापरण्यात येणारे लहान फोकस, फिरता लाईट आदी भारतीय बनावटीच्या वस्तूंना मागणी वाढली आहे. बाजारातसुद्धा चैतन्याचे वातावरण आहे. (तालुका प्रतिनिधी)

व्हॉट्सअपवरील आवाहनाला प्रतिसाद
चीन वारंवार भारतविरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून त्या देशाला अडचणीत आणावे, असे आवाहन करणारे संदेश व्हॉट्सअपवरून पाठविले जात आहे. पुसदमधील नागरिकांनी या संदेशांना मोठा प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे. सण उत्सवांकरिता लागणारी लायटींग खरेदी करताना चीन वस्तू प्रामुख्याने टाळून भारतीय बनावटीच्या वस्तूंनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पुसदच्या बाजारपेठेत सध्या वेगळेच वातावारण दिसून येत आहे.

Web Title: Flaming light, Chinese lighting later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.