आर्णी पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:05+5:30
यापूर्वी सभापती पद अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव होते. मात्र आरक्षणानुसार पंचायत समितीत सदस्यच उपलब्ध नसल्याने सभापती निवड प्रक्रिया लांबणीवर पडली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारीला शुध्दीपत्रक काढून सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला किंवा पुरुष असे काढले. त्यामुळे काँग्रेसचे विलास रामभाऊ अगलदरे यांची अविरोध निवड झाली.

आर्णी पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : आरक्षणामुळे आर्णी पंचायत समिती सभापती निवडीची लांबलेली निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आली. सभापती पदी काँग्रेसचे विलास रामभाऊ अगलदरे यांची अविरोध निवड करण्यात आली. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार सभापती पद काँग्रेस व उपसभापती पद शिवसेनेकडे देण्याचे निश्चित झाले होते.
यापूर्वी सभापती पद अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव होते. मात्र आरक्षणानुसार पंचायत समितीत सदस्यच उपलब्ध नसल्याने सभापती निवड प्रक्रिया लांबणीवर पडली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारीला शुध्दीपत्रक काढून सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला किंवा पुरुष असे काढले. त्यामुळे काँग्रेसचे विलास रामभाऊ अगलदरे यांची अविरोध निवड झाली.
दरम्यान, आधी काढलेल्या आदिवासी महिला राखीव आरक्षणाला अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव करावे, अशी मागणी भाजपच्या पंचायत समिती सदस्या प्रियतमा अनिल बन्सोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र तसे आरक्षण देता येत नसल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकाºयांनी आदिवासी महिला राखीव ऐवजी आदिवासी राखीव आरक्षण दिले.
आर्णी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे चार, शिवसेना दोन व भाजपचे दोन असे संख्याबळ आहे. मंगळवारी झालेल्या सभापती निवडणुकीत भाजपचे सदस्य प्रियतमा अनिल बन्सोड व पपिता संतोष भाकरे अनुपस्थित होते. काँग्रेसच्या सविता भारत राठोड उपस्थित राहू शकल्या नाहीत. सभेला विलास अगलदरे, श्रीकांत वसंतराव राठोड, सूर्यकांत जयस्वाल, अनुपकुमार राजेंद्र जाधव, ज्योती संदीप उपाध्ये हे सदस्य उपस्थित होते. निवड प्रक्रियेला पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार धीरज स्थूल होते.
लोणी गणात पंचायत समितीची सत्ता
विलास अगलदरे यांच्या माध्यमातून लोणी गणाला सभापती पद मिळाले आहे. आरक्षणाने एकमेव सदस्य पात्र ठरल्याने निवड बिनविरोध झाली. नवनिर्वाचित सभापतींना काँग्रेसचे नेते आरीज बेग, राजू विरखेडे, शिवसेनेचे उपसभापती रवी राठोड, मावळते सभापती सूर्यकांत जयस्वाल यांनी आनंद व्यक्त केला.