पाच तासात ४१० वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:43+5:30
कोणत्याही वाहन चालकाला कागदपत्रांची विचारणा केली जाते. ते नसेल तर वाहन मुख्यालयात जमा केले जाते. सोमवारी सकाळी ७ ते १२ या पाच तासात तब्बल ४१० दुचाकी व २० चारचाकी वाहने जप्त केली गेली. वाहनधारकांकडून एक लाख २५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.

पाच तासात ४१० वाहने जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वारंवार आवाहन करूनही रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढत आहे. म्हणून पोलिसांनी आता लाठी ऐवजी आर्थिक दंडाचे हत्यार उपसले आहे. कोणत्याही वाहन चालकाला कागदपत्रांची विचारणा केली जाते. ते नसेल तर वाहन मुख्यालयात जमा केले जाते. सोमवारी सकाळी ७ ते १२ या पाच तासात तब्बल ४१० दुचाकी व २० चारचाकी वाहने जप्त केली गेली. वाहनधारकांकडून एक लाख २५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
स्टेट बँक, बसस्टँड, दत्त चौक, टांगा चौक या प्रमुख चौकात वाहतूक शाखेने कारवाई केली. भाजीपाला, किराणा, दुध अशा चिल्लर वस्तू खरेदीसाठी नागरिक शहराच्या दुसऱ्या टोकाला पोहचले होते. काहींनी २०१४ चे प्रिस्क्रिप्शन दाखवून औषध खरेदीचा तर काहींनी गोळ्या परत करण्याचा बहाणा शोधला.
नागरिक म्हणतात, पोलिसांकडे तरी कागदपत्रे सोबत असतात काय?
बहुतांश दुचाकी वाहनांची खरेदीचे पहिले वर्ष वगळता पीयूसी घेतली जात नाही. नियमानुसार ती आवश्यक असली तरी त्यासाठी कधी वाहतूक पोलीस कारवाई करीत नाही. शिवाय गाडीची कागदपत्रे वाहनात ठेवली जात नाही, सुरक्षेच्या कारणावरून ती घरी ठेवली जातात. ज्यांची गाडी कर्जाऊ असेल त्यांची कागदपत्रे बँका व वित्तीय संस्थांकडे तारण असतात. ही कागदपत्रे आणायची कोठून असा सर्वसमावेशक सवाल आहे. वाहन चालविण्याचा परवाना प्रत्येकाने खिशात बाळगावा व तो नसेल तर निश्चितच कारवाई करावी, अशी भूमिकाही या व्यावसायिकांनी मांडली आहे. सोमवारी पोलिसांनी लायसन्स, आरसी, इन्शूरन्स एवढेच नव्हे तर पीयूसीची मागणी केली. सर्वांचाच गोंधळ उडाला. काहींना वाहन जप्त झाल्याने पायदळ घरी जावे लागले. पोलीस प्रशासनाने जनतेवर थेट कारवाई करण्याऐवजी आधी आपल्या अधिनस्त सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची अशीच अचानक तपासणी करून त्यांच्याकडे नागरिकांना मागितली जाणारी पीयूसीसह सर्व कागदपत्रे आहेत का याची तपासणी करावी, अशी मागणीही व्यापारी व व्यावसायिकांमधून केली जात आहे.
ठोक व्यापारी, व्यावसायिकांमध्ये मात्र रोष
पोलिसांनी सोमवारी ४१० वाहने जप्तीची कारवाई केली असली तरी त्या विरोधात शहरातील ठोक व्यापारी, किरकोळ विक्रेते व व्यावसायिकांमध्ये असंतोष दिसला. याच कारवाईवरून टांगाचौक मार्गावरील अनेक ठोक विक्रेत्यांनी सोमवारी दुकानांचे शटर खाली टाकून कायम बंदची भूमिका घेतली होती. किरकोळ विक्रेते साहित्य खरेदीसाठी ठोक विक्रेत्यांकडे जातात. हे ठोक विक्रेते मुख्य बाजारपेठेत असल्याने शहर व परिसरातील कुठल्याही किरकोळ विक्रेत्याला या बाजारपेठेत यावे लागते. त्यातच माल नेण्यासाठी हमाल, सायकलरिक्षा, ऑटोरिक्षा, मालवाहू वाहन मिळत नाही. अशा वेळी दुचाकी वाहनावर माल दुकानापर्यंत नेणे हाच पर्याय असतो. अशा वेळी पोलीस कारवाई करत असतील तर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवायची कशासाठी असा सवाल या विक्रेत्यांकडून उपस्थित केला गेला. अशीच अवस्था दूध विक्रेते, गॅस सिलिंडर आणायला जाणाºयांची झाली आहे. औषधांचेही असेच आहे. ज्या डॉक्टरने औषधी लिहून दिली, त्याच डॉक्टरच्या परिसरातील मेडिकलमध्ये ती औषधी मिळते. त्यामुळे घरापासून दूर या औषध खरेदीसाठी यावेच लागते. त्यात पोलीस कारवाई करीत असल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घराजवळच खरेदी करा
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची सवलत असली तरी नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेऊन शहरभर भटकू नये, या टोकावरून त्या टोकावर जाऊ नये, त्याऐवजी घराच्या परिसरातच मिळणाºया दुकानांमधून किराणा, भाजी, दूध, औषधी आदी साहित्य घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यामुळे शहरात वाहनांची गर्दी वाढली. वार्डात भाजी विक्रेते फिरत असताना नागरिक खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेतच येतात. अशांना ब्रेक लावण्यासाठीच जप्तीची ही कारवाई करावी लागली.
- सतीश चवरे
प्रभारी, जिल्हा वाहतूक शाखा.