महागाव : तालुक्यातील अधर पूस प्रकल्पातून समृद्धीचे स्वप्न रंगविणाऱ्या महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम प्रतीक्षाच आहे. नऊ हजार हेक्टर क्षमतेच्या या प्रकल्पातून प्रत्यक्षात पुरसे सिंचनच होत नाही. केवळ चार हजार हेक्टरवर सिंचनाचा दावा केला जात असून अद्यापही पाच हजार हेक्टर सिंचन कागदावरच दिसत आहे. २० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे. महागाव तालुक्यातील वेणी येथे अधर पूस प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावर्षी या प्रकल्पात पुरेसे पाणी आहे. परंतु अद्यापही टेलपर्यंत पाणीच पोहोचत नाही. नऊ हजार सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने ओलितच झाले नाही. धरणाच्या निर्मितीपासून कालवे आणि त्या अनुषंगाने सर्व गेट, सिमेंट प्लग आदींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. उपविभागीय प्रकल्प अधिकारी अरुण कलवले आणि शाखा अभियंता अरविंद भगत यांनी गत वर्षी २० कोटी रुपये दुरुस्ती देखभाल खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला. परंतु त्यावर लोकप्रतिनिधींकडून कोणताच पाठपुरावा झाला नाही. तो प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे.धरण निर्मितीनंतर कालवे सिमेंट प्लग, गेट आदी कामांसाठी पुरेसा निधीच देण्यात आला नाही. जी काही कामे हाती घेतली जातात. ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येत आहे. कायमस्वरूपी कालवे दुरुस्ती, सिमेंट लायनिंग, गेट दुरुस्ती होत नसल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. हे वास्तव असून शेतकऱ्यांना जीवंत ठेवण्यासाठी ओलिताची सुविधा देणे गरजेचे आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, हरभरा, गहू, ज्वारी, भुईमुग आदी पिके घेतली जातात. साधारणत: ८० टक्के नागरिकांचा शेती हा व्यवसाय आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना या धरणाकडून मोठ्या अपेक्षा आहे. परंतु धरणाचे पाणी मिळत नाही. विजेची समस्याही कायम आहे. यंदा मुबलक पाणी साठा असूनही ते केव्हा मिळेल याची खात्री नाही. पाटबंधारे विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत रबीला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेल तोच खरा दिवस. (शहर प्रतिनिधी)
महागावात पाच हजार हेक्टर सिंचन कागदावरच
By admin | Updated: November 10, 2014 22:50 IST