पाचही तालुके झाले नक्षलमुक्त
By Admin | Updated: January 29, 2015 23:16 IST2015-01-29T23:16:35+5:302015-01-29T23:16:35+5:30
नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्यातील वणी, मारेगाव, पांढरकवडा, आर्णी व घाटंजी हे पाचही तालुके नक्षलमुक्त झाल्याचे शासनाने घोषित केले़ त्यामुळे या पाच तालुक्यांना मिळणाऱ्या

पाचही तालुके झाले नक्षलमुक्त
कर्मचाऱ्यांचे वेतन घटले : भारनियमनाचे भूत बसले मानगुटीवर
वणी : नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्यातील वणी, मारेगाव, पांढरकवडा, आर्णी व घाटंजी हे पाचही तालुके नक्षलमुक्त झाल्याचे शासनाने घोषित केले़ त्यामुळे या पाच तालुक्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा व निधी यांना लगाम लागणार आहे़ पाचही तालुक्यातील हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनात घट होणार आहे़ सोबतच वीज वितरण कंपनीला विजेचे भारनियमन करण्यास मोकळीक मिळाली आहे़
जिल्ह्यातील वणी, झरी, पांढरकवडा, आर्णी, घाटंजी हे पाच तालुके आंध्र प्रदेश सीमेला लागून आहे़ या पाचही तालुक्यांत जंगली भूभाग मोठ्या प्रमाणात आहे़ मोठी वनसंपदा आहे. त्यामुळे कधी काळी या भागात नक्षली कारवाया होण्याची चिन्हे दिसत होती़ काही वर्षांपूर्वी वणी तालुक्यातील साखरा (कोलगाव) येथे नक्षलवाद्यांनी एस़टी़महामंडळाची बस पेटविली होती़ त्यामुळे पोलीस संचालकांच्या अहवालावरून हे पाचही तालुके सन २००२ मध्ये नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते़
हे पाचही तालुके नक्षलग्रस्त घोषित झाले तेव्हापासून अर्थात सन २००२ पासून या पाच तालुक्यांना नक्षलग्रस्त विभागाला मिळणारा विशेष निधी मिळत होता. सोबतच या पाचही तालुक्यात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती व पाचव्या वेतन आयोगाच्या मूळ वेतनावर १५ टक्के नक्षलग्रस्त भत्ता मिळत होता़ त्यामुळे या पाच तालुक्यातील कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील कर्मचाऱ्यांपेक्षा हजार-दोन हजार रूपये अधिक वेतन मिळत होते़
दरम्यान, गेल्या १० ते १२ वर्षांपासून या पाचही तालुक्यात एकाही ठिकाणी नक्षली कारवाई झाली नाही़ तरीही शासनाच्या कोट्यवधी रूपयांचा निधी केवळ जादा वेतनावर अकारण खर्च होत होता़ राज्याच्या पोलीस महासंचालकांनी नक्षलग्रस्त भागाचा वेळोवेळी आढावा घेऊन काही वेळा या विशेष योजनेला मुदतवाढही दिली़ त्यामुळे कर्मचाऱ्यांवर शासनाची १० ते १२ वर्षे कृपा कायम राहिली. मात्र राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालकांनी यावर्षी राज्यातील सर्व नक्षलग्रस्त भागांचा आढावा घेतला व ज्या भागात गेल्या कित्येक वर्षांपासून एकही नक्षली कारवाई झाली नाही़, त्या तालुक्यांना नक्षलमुक्त म्हणून घोषित केले़ यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश आहे़
शासनाने आता हे पाच तालुके नक्षलमुक्त म्हणून घोषित केल्याने जानेवारी २०१५ या महिन्याच्या वेतनापासून कर्मचाऱ्यांचा नक्षल भत्ता बंद करण्याचे, तसेच कालबध्द पदोन्नती मागे घेण्याचे आदेश विविध विभागांना प्राप्त झाले आहेत़ परिणामी या पाचही तालुक्यातील प्रत्येक कर्मचारी, शिक्षक यांचे वेतन हजार-दोन हजार रूपयांनी कमी होणार आहे. यापूर्वी नक्षलग्रस्त भागात रात्रीचे वीज भारनियमन करू नये, असा शासनाचा आदेश होता़ त्यामुळे या पाचही तालुक्यात रात्री भारनियमन होत नव्हते़ मात्र आता जनतेला रात्रीच्या वीज भारनियमनालाही सामोरे जावे लागणार आहे़ नक्षलग्रस्त कृती कार्यक्रमांतर्गत मिळणारा विशेष निधीही आता या पाच तालुक्यांना मिळणार नाही. परिणामी काही प्रमाणात विकासाची दारेही बंद होणार आहे़ राज्याचे पोलीस महासंचालक आता २०१६ मध्ये पुन्हा या भागातील नक्षल कारवायांचा आढावा घेणार आहे़ या काळात एखाद्या ठिकाणी नक्षली कारवाई झाल्यास, पुन्हा तो भाग नक्षलग्रस्त घोषित होण्याची शक्यता आहे. तथापि कोणतीही कारवाई झाल्याचे निष्पन्न न झाल्यास हा भाग कायमचा नक्षलमुक्त होण्याची शक्यता बळावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)