वर्षभरात साडेपाच हजार शस्त्रक्रिया
By Admin | Updated: November 24, 2014 23:08 IST2014-11-24T23:08:12+5:302014-11-24T23:08:12+5:30
जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात ही योजना जिल्ह्यातील रूग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांसह

वर्षभरात साडेपाच हजार शस्त्रक्रिया
जीवनदायी आरोग्य योजना : शस्त्रक्रियांसाठी रूग्णालयांना १३.३७ कोटी
यवतमाळ : जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात ही योजना जिल्ह्यातील रूग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांसह राज्यातील विविध रूग्णालयांमध्ये पाच हजार ६६२ रूग्णांवर या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. शस्त्रक्रियांसाठी रूग्णालयांना १३ कोटी ३७ लाख रुपये देण्यात आले आहे.
जीवनदायी योजनेंतर्गत जवळजवळ सर्वच आजारांवर दीड लाख रुपये खर्चाच्या मर्यादेपर्यंत या योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येते. ही एक आरोग्य योजना असून या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचारासोबत १२१ प्रकारच्या आजारांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक लाख ५० हजारापर्यंत तर मूत्रपिंड प्रत्यारोपणाकरिता दोन लाख ५० हजार रुपयापर्यंत योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेसाठी लाभार्थ्यांजवळ पिवळे किंवा केसरी शिधापत्रक अथवा अन्नपूर्णा, अंत्योदय योजनेचे शिधापत्रक असणे आवश्यक आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यात ५ लाख १८ हजार कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहे. त्यात १ लाख ३३ हजार पिवळे शिधापत्रिकाधारक, २ लाख ४७ हजार केशरी शिधापत्रिकाधारक, १ लाख ३४ हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर ४ हजार ६९२ अन्नपूर्णा योजनेचे शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबांचे आरोग्य पत्र तयार करून वितरणाचे काम जिल्हयात मोठया प्रमाणावर सुरु आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ९६ हजार कुटुंबांना आरोग्यपत्र वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी योजनेचा शुभारंभ तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला होता. २१ नोव्हेंबर रोजी योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षात जिल्ह्यातील एकूण ५ हजार ६६२ रूग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी १६४२ शस्त्रक्रिया जिल्ह्यातील या योजनेसाठी मान्यताप्राप्त आठ रूग्णालयांमध्ये करण्यात आल्या आहेत. अन्य शस्त्रक्रिया या राज्यातील विविध रूग्णालयांमध्ये झाल्या आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांना शस्त्रक्रियांसाठी ४० लाख ३९ हजार रुपये वितरित करण्यात आले. तर जिल्ह्यासह राज्यातील विविध रूग्णालयांना १३ कोटी ३७ लाख रुपये शस्त्रक्रियेपोटी देण्यात आले आहे.
आर्थिक अडचणीमुळे खर्चिक शस्त्रक्रिया सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे गंभीर आजाराप्रसंगी फार मोठे संकट गरीब व गरजू रूग्णांपुढे उभे राहत होते. आता या योजनेंतर्गत सहज शस्त्रक्रिया करता येत असल्याने हजारो रूग्णांना दिलासा मिळत असून त्यांच्यासाठी योजना खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. (प्रतिनिधी)