नेरमध्ये डिजीटल शाळेचा पहिला मान मंगरूळला
By Admin | Updated: August 10, 2015 02:09 IST2015-08-10T02:09:08+5:302015-08-10T02:09:08+5:30
तालुक्यात डिजीटल शाळेचा पहिला मान मंगरूळ या गावाने मिळविला आहे. ७०० लोकसंख्येच्या या गावातील शाळेच्या शिक्षकांनी मोठ्या प्रयत्नातून ही उपलब्धी मिळविली आहे.

नेरमध्ये डिजीटल शाळेचा पहिला मान मंगरूळला
नेर : तालुक्यात डिजीटल शाळेचा पहिला मान मंगरूळ या गावाने मिळविला आहे. ७०० लोकसंख्येच्या या गावातील शाळेच्या शिक्षकांनी मोठ्या प्रयत्नातून ही उपलब्धी मिळविली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सुरू केलेले प्रयत्न प्रेरणा देणारे आहे.
शाळा डिजीटल करायचीच या ध्येयाने सदर शाळेचे मुख्याध्यापक विनोद टोंगे, शिक्षक जगदीश खाडे आदींनी त्या दिशेने वाटचाल सुरू केली. शाळा डिजीटल करण्यासाठी शासनाकडून कुठलाही निधी मिळणार नाही, लोकसहभागातूनच ही उपलब्धी मिळवायची आहे, असे शिक्षण विभागाच्या बैठकीत सांगण्यात आले. गाव अविकसित असल्याने लोकसहभागातून शाळा डिजीटल करायची कशी, यावर विचार विनिमय करण्यात आला. यातून मार्ग सापडला.
शाळेकडे १३ एकर शेती आहे. ही शेती मक्त्याने दिली जाते. यातून मिळणारी रक्कम शाळेच्या कोशात जमा करण्यात येते. याच रकमेचा उपयोग शाळा डिजीटल करण्यासाठी करता येईल, असा विचार शाळा व्यवस्थापन समितीपुढे मांडण्यात आला. जमा असलेल्या रकमेपैकी ९० हजार रुपये समितीकडून मंजूर करून प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आणि तो मंजूरही झाला. या निधीतून शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. वर्गामध्ये स्मार्ट बोर्ड लावण्यात आले. मुख्याध्यापक विनोद टोंगे यांनी स्वखर्चातून लॅपटॉपही खरेदी केला. आता या माध्यमातून वर्ग एक ते पाचच्या विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान मिळणार आहे. पाठ्यपुस्तकातील प्रयोग, ठिकाणे आदी बाबींची माहिती प्रत्यक्ष स्मार्ट बोर्डवर दिसणार असल्याने दीर्घकाळ या बाबी स्मरणात राहणार आहे. यातूनच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धर्मराज चव्हाण, श्रीकृष्ण राठोड, केशव आडे, सतीश अहिरे, किसन गणवीर, अंजिता धारगावे, मीना घरडे, सुनीता चव्हाण, सुरेश जाधव, शालीनी चव्हाण आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्यही यासाठी मोलाचे ठरले आहे. (तालुका प्रतिनिधी)