शुक्रवारपासून अभियांत्रिकीची प्रथम फेरी
By Admin | Updated: June 25, 2015 02:30 IST2015-06-25T02:30:52+5:302015-06-25T02:30:52+5:30
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विकल्प अर्ज (आॅप्शन फॉर्म) कसा भरावा ...

शुक्रवारपासून अभियांत्रिकीची प्रथम फेरी
कार्यशाळा : ‘जेडीआयईटी’मध्ये विकल्प अर्जाची नि:शुल्क सेवा
यवतमाळ : प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाची प्रथम फेरी शुक्रवार २६ जूनपासून सुरू होत आहे. याच दिवशी स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विकल्प अर्ज (आॅप्शन फॉर्म) कसा भरावा याबाबतची विशेष कार्यशाळा सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. शिवाय या महाविद्यालयात विकल्प अर्ज भरण्याची नि:शुल्क सेवा २६ ते २८ जूनपर्यंत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
विकल्प अर्ज भरणे हा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील एक महत्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे. या आॅनलाईन अर्जात विद्याथ्यांने स्वत:च्या पसंतीचे महाविद्यालय व त्यातील पसंतीची शाखा (ब्रँच) याचा पसंतीक्रम देणे अपेक्षित असते. परंतु योग्य माहिती आणि मार्गदर्शनाअभावी बऱ्याचदा चुकीचे विकल्प निवडले जातात. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी ‘जेडीआयईटी’मध्ये २६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता कार्यशाळा घेण्यात येत आहे.
या कार्यशाळेत विकल्प अर्ज कसा भरावा, त्याची प्रक्रिया, योग्य ते महाविद्यालय कसे निवडावे, आवडीच्या शाखांचा पसंतीक्रम कसा ठरवावा, कॅप प्रक्रियेचे राऊंडस्, कट-आॅफ आदी विषयांवर प्रा. डॉ. संजय गुल्हाने मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा आणि विकल्प अर्ज भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या इंटरनेट नि:शुल्क सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. विवेक गंधेवार (९७६३७०२५६९), प्रा. संदीप सोनी (९७६३७०२५८३) यांच्याशी संपर्क साधता येईल. (वार्ताहर)