पहिलीच पोस्टिंग, चांगले परफॉर्म करू
By Admin | Updated: January 7, 2017 00:24 IST2017-01-07T00:24:37+5:302017-01-07T00:24:37+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आपली पहिलीच पोस्टींग आहे, या जिल्ह्यात आपण चांगले परफॉर्म करू

पहिलीच पोस्टिंग, चांगले परफॉर्म करू
नव्या पोलीस अधीक्षकांचा विश्वास : शांततेत निवडणुका पार पाडण्याला प्राधान्य
सुरेंद्र राऊत यवतमाळ
जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आपली पहिलीच पोस्टींग आहे, या जिल्ह्यात आपण चांगले परफॉर्म करू अशा शब्दात नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी विश्वास व्यक्त केला.
यवतमाळचे एसपी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी एम. राज कुमार येथे दाखल झाले. मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी यवतमाळ शहर, वडगाव रोडचे ठाणेदार, शहरचे एसडीपीओ, एलसीबी आदी अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली. यावेळी एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, आपण सन २०१० च्या बॅचचे आयपीएस आहोत. या काळात आपल्या चार ते पाच ठिकाणी नियुक्त्या झाल्या. गेली काही महिने आपण नागपुरात परिमंडळ-३ चे उपायुक्त होतो. आता पहिल्यांदाच यवतमाळ सारख्या सर्वच दृष्टीने मोठ्या असलेल्या जिल्ह्याची एसपी म्हणून जबाबदारी शासनाने दिली आहे. ती आपण समर्थपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी सांगितले की, पुढील काही दिवस एकूणच जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक आणि विविध अंगांनी अभ्यास करू. लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पाडण्याला आपले प्राधान्य राहणार आहे.
तत्पूर्वी एम. राज कुमार यांनी मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडून जिल्ह्यातील गुन्हेगारी, जातीय सलोखा, दंगलींचा इतिहास, राजकीय वर्चस्व, संघटित गुन्हेगारी अशा विविध मुद्यांवर माहिती जाणून घेतली.