दिग्रस तालुका जिल्ह्यात प्रथम

By Admin | Updated: June 14, 2017 00:19 IST2017-06-14T00:19:57+5:302017-06-14T00:19:57+5:30

अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित होताच आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धांदल उडाली.

First in Digras taluka district | दिग्रस तालुका जिल्ह्यात प्रथम

दिग्रस तालुका जिल्ह्यात प्रथम

८६.८८ टक्के निकाल : महागाव ८६.४३, पुसद ८२.८२, उमरखेड ७५.६४ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित होताच आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धांदल उडाली. सायबर कॅफेसह मोबाईलवर अनेकांनी आपला आॅनलाईन निकाल जाणून घेतला. दहावीच्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ७८.०३ टक्के लागला असून यात सर्वाधिक दिग्रस तालुक्याचा ८६.८८ टक्के निकाल आहे.
दिग्रस तालुक्यातून दोन हजार ७०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन हजार ३५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८५.५९ तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.७६ आहे. दिग्रस येथील दिनबाई विद्यालयाचा निकाल ८५.४७ टक्के लागला असून साहील घोंगडे याला ९९.४० टक्के गुण मिळाले आहे. तर वैभव आडे याला ९८.८० टक्के, रोशन चव्हाण ९८ टक्के गुण मिळाले आहे. मोहनाबाई शाळेचा निकाल ८७.६६ टक्के असून प्रणवती सूर्यवंशी हिला ९९.४० टक्के गुण मिळाले आहे. अंजली गुजर ९९ टक्के, अंकिता काटकर ९८.४० टक्के गुण मिळाले आहे. राष्ट्रीय विद्यालय ७५ टक्के असून अथर्व काळे याला ९६.०५ टक्के, जयश्री मदने हिला ९५.०५ टक्के गुण मिळाले आहे. नारायण कोषटवार विद्यालय ८२ टक्के निकाल लागला असून प्रतिक कुबडे याला ९६ टक्के, सत्यम गुप्ता याला ९०.४० टक्के गुण मिळाले आहे. बापुराव बुटले विद्यालय ९२ टक्के असून अंकिता धवने हिला ९१.२० टक्के, शांती केतन चिरडे हिला ९१ टक्के गुण मिळाले आहे.
विद्या निकेतन इंग्लिश स्कूल १०० टक्के निकाल लागला असून शेजल अटल हिला ९८.६० टक्के, वैष्णवी चांडक हिला ९७.८० टक्के, चैताली राठोड हिला ९७.२० टक्के गुण मिळाले आहे. दामोदर पाटील इंग्लिश मीडियम स्कूल ८३.३३ टक्के निकाल लागला असून साक्षी इहरे हिला ९२.६० टक्के तर जैत शेख याला ८६ टक्के गुण मिळाले आहे.
महागाव तालुक्याचा ८६.४३ टक्के निकाल लागला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. या परीक्षेला दोन हजार ६३० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी दोन हजार २७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.५५ तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७२ आहे. पुसद तालुक्यातून पाच हजार ६१० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी चार हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ८२.८२ आहे. मुले ८०.५६ टक्के तर मुली ८६.२१ टक्के निकाल लागला आहे.
उमरखेड तालुक्यातून तीन हजार ७३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ७५.६४ आहे. मुले ७३.०१ आणि मुली ७८.६५ टक्के उत्तीर्ण झाले आहे. दहावीच्या निकालाची गत काही दिवसांपासून उत्सुकता लागली होती. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.


हावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी घोषित झाला असून यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्याने बाजी मारली. सोळाही तालुक्यात दिग्रस अव्वल ठरला असून या तालुक्याचा निकाल ८६.८८ टक्के आहे. तर महागाव ८६.४३ टक्के, पुसद ८२.८२, तर उमरखेड तालुक्याचा ७५.६४ टक्के निकाल लागला आहे. निकाल बघण्याची उत्सुकता दिसत होती.

पुसदमध्ये नऊ शाळांचा निकाल १०० टक्के
पुसद तालुक्यातील नऊ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून तालुक्यातील सत्तारही शाळांचे निकाल समाधानकारक लागले आहे. ९० टक्केपेक्षा अधिक निकाल लागलेल्या शाळांची संख्या २२ आहे, तर ८० टक्केपेक्षा जास्त निकाल लागलेल्या शाळांची संख्या १८ आहे. सर्वात कमी ३२ टक्के निकाल पुसद शहरातील एका शाळेचा लागला आहे. तालुक्यातील मातोश्री एमपीएन कॉन्व्हेंट, उर्दू गर्ल्स गायमुखनगर, पी.यू. हायस्कूल पुसद, नवजीवन कॉन्व्हेंट, शमसूल उलम उर्दू हायस्कूल, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल, सेंट मेरी कॉन्व्हेंट, शासकीय गर्ल्स रेसिडंसी स्कूल आसारपेंड, राणी लक्ष्मीबाई शाळा पुसद यांचा १०० टक्के निकाल लागला. शहरातील जनता शिक्षण प्रसारक मंडळ मराठी शाळेतील २६ विद्यार्थ्यांपैकी आठच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ३२ आहे. त्या खालोखाल पापालाल जयस्वाल शाळेचा निकाल ३३.३३ टक्के लागला आहे. या सोबतच लोकहित विद्यालय पुसद ४८.३३ टक्के, मातोश्री जिल्हेवार शाळा श्रीरामपूर ४७.२२ टक्के, सुधाकरराव नाईक व्हीजेएनटी शाळा घाटोडी ४८.४८ टक्के, लोभिवंत महाराज विद्यालय ४७.३६ टक्के निकाल लागला आहे. शहरातील चार कॉन्व्हेंटचा निकाल १०० टक्के निकाल तर राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची दहावीची पहिलीच बॅच असताना या शाळेचा १०० टक्के निकाल लागला. शहरातील तीन उर्दू शाळांचा निकाल १०० टक्के लागला, हे विशेष.

झोपडीत राहणाऱ्या दिग्रसच्या साहीलला ९९.४० टक्के गुण
दिग्रस : चंद्रमौळी झोपडीत राहून ज्ञानसाधना करणाऱ्या दिग्रस येथील साहील सुनील घोंगडे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९.४० टक्के गुण प्राप्त केले आहे. विविध सुविधा असणाऱ्या विद्यार्थ्यांना कितीही गुण मिळाले तरी साहीलने मिळविलेले हे यश पूर्वच म्हणावे लागेल. दिनबाई विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या साहीलचे आई, वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. साहीलचे वडील सुनील घोंगडे दूध संकलनाचे काम करीत होते. परंतु दुधाची आवक कमी झाल्याने त्यांना आता मोलमजुरी करावी लागते. अल्पशा मजुरीत कुटुंबाचा गाडा हाकत आहे. अशा या कुटुंबातील गुणवंत साहीलने आपले नाव उज्ज्वल केले. कोणत्याही सुविधा नसताना त्याने दहावीच्या परीक्षेत हे यश संपादित केले. साहीलला ९९.४० टक्के गुण मिळाल्याचे माहीत होताच आई, वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओसंडून वाहू लागले. साहीलला आयएएस होवून प्रशासकीय सेवेत जायचे आहे. विशेष म्हणजे त्याची मोफत शिकवणी संजय खुरिया व सचिन कोरडे यांनी घेतली. तसेच उपमुख्याध्यापक बुटले यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. दिग्रस शहरात साहीलचे कौतुक होत आहे.

 

Web Title: First in Digras taluka district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.