अडगाव येथे आगीत दोन घरे भस्मसात
By Admin | Updated: October 24, 2015 02:19 IST2015-10-24T02:19:17+5:302015-10-24T02:19:17+5:30
तालुक्यातील अडगाव येथील दोन घरांना अचानक आग लागल्याने किराणा दुकानासह घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले.

अडगाव येथे आगीत दोन घरे भस्मसात
पुसद : तालुक्यातील अडगाव येथील दोन घरांना अचानक आग लागल्याने किराणा दुकानासह घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले. या आगीत तब्बल तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून एक लाख रुपयांच्या नोटाही जळाल्या. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज असून दसऱ्याच्या दिवशी रात्री ८ वाजता लागलेल्या या आगीने खळबळ उडाली आहे.
अडगाव येथे रामजी केरू चव्हाण आणि त्यांचा मुलगा नारायण रामजी चव्हाण यांची लगत घरे आहे. दसऱ्याचा सण साजरा होत असताना रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक नारायण चव्हाण यांच्या घराला आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. घरी असलेले किराणा दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. ही घटना माहीत होताच गावकऱ्यांनी धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत घरातील एक लाख रुपये रोख, भांडीकुंडी, कपडेलत्ते असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जळून भस्मसात झाला. (प्रतिनिधी)
अग्निशमन वाहन नादुरुस्त
पुसद नगरपरिषदेचे अग्निशमन दल नादुरुस्त असल्याने अडगाव येथे आग विझविण्याच्या कामी येवू शकले नाही. गावकऱ्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. मात्र वाहन नादुरुस्त असल्याचे कारण सांगितले. त्यामुळे ही आग मोठी झाली आणि नुकसान झाल्याचा आरोप गावकरी करीत आहे.