पुसद, फुलसावंगी येथे आग
By Admin | Updated: December 13, 2015 02:31 IST2015-12-13T02:31:55+5:302015-12-13T02:31:55+5:30
पुसद येथे घराला तर फुलसावंगी येथे मोबाईल शॉपीला आग लागून सात लाख रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही घटना शनिवारी घडल्या.

पुसद, फुलसावंगी येथे आग
पुसद/फुलसावंगी : पुसद येथे घराला तर फुलसावंगी येथे मोबाईल शॉपीला आग लागून सात लाख रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही घटना शनिवारी घडल्या.
नवीन पुसद भागातील भगिरथा पुंडलिक भोरकडे या रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या घराने दुपारी पेट घेतला. पाहता-पाहता संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घरातील कपडे, धान्य आदी साहित्याचा कोळसा झाला. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साधनांव्दारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घरातील साहित्याची हानी झाली होती. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांकडून कारवाई सुरू होती.
मोबाईल गॅलरीचे पाच लाखांचे नुकसान
महागाव तालुक्याच्या फुलसावंगी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मोबाईल गॅलरीला लागलेल्या आगीत मोबाईलसह पाच लाख रुपयांच्या साहित्याची हानी झाली. दीपक रामराव जाधव यांचे बसस्थानक परिसरात मोबाईल विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद करून ते घरी परतले. रात्री कापसाचे ट्रक भरणाऱ्या काही मजुरांना या दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. ही बाब तत्काळ जाधव यांना कळविण्यात आली. परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण करत मोबाईल शॉपीमधील सर्व वस्तू आपल्या कवेत घेतल्या. अवघ्या काही वेळात विविध कंपन्यांचे मोबाईल, सीमकार्ड, इर्न्व्हटर, कॉम्प्युटर, फर्निचर अशा पाच लाख रुपयांच्या साहित्याचा कोळसा झाला. आगीचे कारण कळू शकले नाही. (प्रतिनिधी)