दिग्रस नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीला आग
By Admin | Updated: March 18, 2015 02:21 IST2015-03-18T02:21:31+5:302015-03-18T02:21:31+5:30
येथील नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीला मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली.

दिग्रस नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीला आग
दिग्रस : येथील नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीला मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत ३० वर्षाआधीची जुनी कागदपत्रे जळाली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला लागून नगरपरिषदेची जुनी इमारत आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील खोलीतून धूर निघताना दिसला. ही बाब नगरपरिषदेला कळविण्यात आली. काही वेळातच नगरपरिषदेचे अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आली. ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीच्या तळमजल्यावर दवाखाना, औषधी दुकान, महिला अर्बन पतसंस्था आदी कार्यालय आणि दुकाने आहेत. मात्र या आगीची झळ त्यांंना पोहोचली नाही. यावेळी वरिष्ठ लिपिक दयाराम पवार यांनी सांगितले की, आगीत ३० ते ४० वर्षाआधी जुने कागदपत्रे जळाली आहे. आग लागल्याची माहिती होताच नागरिकांनी धाव घेतली. अनेकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे दिग्रसला अग्नीशमन वाहन असले तरी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आग विझविली. (प्रतिनिधी)