दिग्रसमध्ये आग लागून दुकानांचे नुकसान

By Admin | Updated: June 5, 2016 02:14 IST2016-06-05T02:14:44+5:302016-06-05T02:14:44+5:30

येथील नगरपरिषदेच्या जुन्या चुंगी नाक्याजवळ असलेल्या कचऱ्याने पेट घेतल्याने लगतच्या लहान मोठ्या

Fire damage to shops in Digras | दिग्रसमध्ये आग लागून दुकानांचे नुकसान

दिग्रसमध्ये आग लागून दुकानांचे नुकसान

कचऱ्यामुळे पसरली आग : पाण्यासाठी अग्निशमन वाहनाचे हेलपाटे
दिग्रस : येथील नगरपरिषदेच्या जुन्या चुंगी नाक्याजवळ असलेल्या कचऱ्याने पेट घेतल्याने लगतच्या लहान मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांना आग लागली. ही घटना शुक्रवारी ३ जून रोजी रात्री ९.३० वाजता घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिग्रस नगरपरिषदचा जुन्या बसस्थानकालगतच्या मध्यवर्ती चुंगी नाक्याजवळ काडी कचरा पसरला आहे. या कचऱ्याने पेट घेतला. ही आग हळूहळू लगतच्या सुकलेल्या पाला पाचोळ्यामुळे पसरत गेली. लहान मोठ्या लाकूड फाट्यच्या दुकानांसह नाक्याच्या माळवदसदृश इमारतीला आगीने आपल्या कवेत घेतले.
रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान आगीच्या ज्वाळा नागरिकांना दिसल्या. त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस ठाणे व नगरपरिषद अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नगरपरिषदेने आपले अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना केले. अग्निशमनच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण काही भागाची आग विझत असताना वाहनामधले पाणी संपले. हेच वाहन पुन्हा पाणी भरण्यासाठी देवनगरस्थित पाण्याच्या टाकीवर गेले. काही मिनिटांतच पाणी घेऊन परत आले व पुन्हा आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला.
या आगीत आसिफ वर्कशॉप, भलगे पान सेंटर, शुभम पेपर स्टॉल, बाँबे इलेक्ट्रिक, स्प्रे प्रिंटिंग, कलीम बॅटरी, गुड गॅरेज, इस्लामी हॉटेल यासह अनेक लहान मोठ्या दुकानांचे नुकसान झाले आहे. वेळेत आग विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग बघण्यासाठी शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. नागरिक व मुख्य रस्त्याची वाहतूक सांभाळताना पोलीस विभागाने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. लहान मोठ्या सर्व व्यावसायिकांनी सुटकेचा श्वास सोडला. या आगीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा तपशील कळू शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Fire damage to shops in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.