बँकेसमोरील रांगा संपता संपेना
By Admin | Updated: January 11, 2017 00:29 IST2017-01-11T00:29:49+5:302017-01-11T00:29:49+5:30
नोटाबंदी होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; तरीही बँकांसमोरील रांगा कायम आहे.

बँकेसमोरील रांगा संपता संपेना
पारवा : नोटाबंदी होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; तरीही बँकांसमोरील रांगा कायम आहे. घाटंजी तालुक्यातील पारवा येथे खातेदारांची दररोज होणारी गर्दी यावरून ही बाब स्पष्ट होते. विशेष म्हणजे, या परिसरातील नागरिकांना अजून तरी ५०० रुपयांची नोट बँकेतून प्राप्त झालेली नाही.
पारवा परिसरातील नागरिकांचे व्यवहार जिल्हा मध्यवर्ती बँकेतून चालतात. मात्र या ठिकाणी पैसा आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे संपूर्ण गर्दी भारतीय स्टेट बँकेच्या पारवा येथील शाखेत होत आहे.
४५०० रुपयांचा विड्रॉल दिला जाईल, असे सांगितले जात असले तरी प्राप्त झालेल्या रकमेवरच कितीचा विड्रॉल द्यायचा, हे ठरविले जाते. बहुतांशवेळा दोन हजार रुपयेच देण्यात येतात. त्यातही चिल्लर करण्यासाठी नागरिकांना दुकानांमध्ये फिरावे लागते.
५०० रुपयांची नोट या बँकेत अजूनही पोहोचली नाही. हाती चार हजार रुपये पडले तरी खर्च करण्याची मात्र चिंता कायमच आहे. कुठलाही व्यावसायिक ऐवढी मोठी रक्कम चिल्लर स्वरूपात देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या नोटा बँकेत उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी आहे. (वार्ताहर)