काँग्रेस कार्यकारिणीचा मुहूर्तच सापडेना !

By Admin | Updated: August 1, 2014 00:27 IST2014-08-01T00:27:58+5:302014-08-01T00:27:58+5:30

विविध विषयांमुळे वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेली काँग्रेस आता जिल्हा कार्यकारिणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना

Finding the secret of the Congress Working Committee! | काँग्रेस कार्यकारिणीचा मुहूर्तच सापडेना !

काँग्रेस कार्यकारिणीचा मुहूर्तच सापडेना !

महिनाभरापासून प्रतीक्षा : सर्व गटांना सामावून घेण्याचे आव्हान
यवतमाळ : विविध विषयांमुळे वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेली काँग्रेस आता जिल्हा कार्यकारिणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना नेमका केव्हाच मुहूर्त मिळतो, याकडे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी सुमारे महिनाभरापूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमधीलच दुसऱ्या फळीतील नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची पत्रपरिषदेत मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा नेत्यांमध्ये एकजूट झाल्याने दिल्लीपर्यंत फॅक्स गेले आणि वामनरावांना राजकीय जीवदान मिळाले. त्यांचा राजीनामा प्रदेश काँग्रेसने नामंजूर केला. कासावार यांनी सुरुवातीला काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली होती. आता त्यांचे जिल्हाध्यक्षपद कायम असले तरी कार्यकारिणी मात्र अस्तित्वात नाही. या नव्या कार्यकारिणीचे गठण होण्याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे. ही कार्यकारिणी बनविताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना प्रतिनिधीत्व देण्याचे आणि सर्व गटातटांना सामावून घेण्याचे आव्हान कासावार यांच्यापुढे राहणार आहे. शिवाय ही कार्यकारिणी जम्बो होऊ नये याचाही विचार करावा लागणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ही कार्यकारिणी ठरविली जाणार असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या असंतुष्टांना नव्या कार्यकारिणीत सामावून घेतले जाते का, की त्यांना बाहेरची वाट दाखविली जाते, याकडे सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील विद्यमान मंत्री, आमदार व नेत्यांना तसेच त्यांच्या मुलांना आगामी विधानसभेची उमेदवारी देऊ नये, अशी जाहीर भूमिका घेतली होती. त्यानंतर या भूमिकेवरून सहा असंतुष्टांनी फारकत घेतली. प्रमुख नऊ असंतुष्ट मात्र आपल्या भूमिकेवर कायम आहेत. त्यांनी या नेत्यांबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी छुपी मोर्चेबांधणीही चालविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या २२ सदस्यांची ३ आॅगस्टला बैठक
काँग्रेस नेत्यांच्या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचा संधी मिळेल तेथे सूड उगविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या गटनेते पदावरून देवानंद पवार यांना हटविण्याची व्युहरचना केली गेली आहे. त्यासाठी ३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या २२ सदस्यांची बैठक काँग्रेस कमिटी कार्यालयात बोलविण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षांमार्फत तसे संदेश पोहोचविले जात आहे. पक्षशिस्त हा निकष पुढे करून पवार यांना हटविले जाण्याची शक्यता आहे. पवार यांना तांडा वस्ती सुधार समितीच्या जिल्हाध्यक्ष पदावरून यापूर्वीच हटविले गेले, हे विशेष.
घाटंजी पाठोपाठ आर्णीत मोर्चेबांधणी
गेली कित्येक वर्ष शिवाजीराव मोघे यांच्या छत्रछायेत वाढलेल्या देवानंद पवार यांनी आता अचानक लोकसभा निवडणुकीपासून मोघेंच्याच विरोधात उघडपणे बंडाचे हत्यार उपसले आहे. मोघेंना त्यांच्याच मतदारसंघात आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न देवानंद पवार यांच्याकडून सुरू आहे. कोरड्या दुष्काळाच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात घाटंजीत भरपावसात मोर्चा काढला गेला. या मोर्चाला छत्र्या घेऊन नागरिकांनी केलेली गर्दी पाहून मोघे समर्थकांमध्ये अस्वस्थता पहायला मिळाली. घाटंजीतील यशाने हुरळून जाऊन पवार यांनी आता आर्णीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानंतर केळापूर-पांढरकवडा त्यांच्या निशाण्यावर राहण्याची शक्यता आहे. आर्णीमध्ये मोघेंच्या विरोधात उघड पत्रकबाजी करणाऱ्या माजी नगराध्यक्ष अनिल आडे यांच्याकडे पवार व मोघे विरोधकांची बैठक बुधवारी पार पडली. त्यात आर्णीमध्येही मोठा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: Finding the secret of the Congress Working Committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.