लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नेर येथील बहुचर्चित अष्टविनायक अर्बन क्रेडिट को ऑप. सोसायटीतील आर्थिक अनियमिततेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ऑडिटरकडून सोमवार, ४ ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे टेस्ट ऑडिट रिपोर्ट सादर केला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई होणार आहे. या प्रकरणात संचालक मंडळावर फौजदारीची टांगती तलवार आहे.
अर्बन अष्टविनायक सोसायटीचे नेर येथे मुख्य कार्यालय असून, माणिकवाडा, मोझर, लोही आणि बोरी अरब येथे शाखा आहेत. सहा ते सात महिन्यांपासून या शाखांमधून ठेवीदार, खातेदारांना विड्रॉल देणे बंद आहे. शिवाय या शाखांना टाळेही लागले आहेत. त्यामुळे खातेदारांनी नेर, दारव्हा आणि लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या. शिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधकांकडे धाव घेत निवेदन देवून ठेवी परत देण्याची मागणी केली. त्यानंतर सहकार विभागाकडून अष्टविनायकचे टेस्ट ऑडिट करण्यासाठी ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली. गत दोन ते तीन महिन्यांपासून बँकेच्या व्यवहाराची तपासणी सुरू होती. अखेर ऑडिट रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. सोसायटीने व्याज आकारणीत चुका करून आणि ठेवींवर जादा व्याज आकारून अनियमितता केली असल्याचा ठपका टेस्ट ऑडिटमधून ठेवण्यात आला आहे. ही एकप्रकारे आर्थिक अनियमितताच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हे प्रकरण खातेदारांच्या निवेदनानंतर गंभीरतेने घेतले होते. त्यामुळे अहवाल प्राप्त होताच संचालक मंडळावर फौजदारी कारवाई केली जाते का, याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे.
२५० पानांचा अहवाल, जादा व्याज आकारणीचा ठपकाअष्टविनायक सोसायटीचा टेस्ट ऑडिट रिपोर्ट एकूण २५० पानांचा आहे. शिवाय या अहवालासोबत याद्याही सादर करण्यात येणार आहे. सोसायटीचे एकूण १९ हजार ९०९ खातेदार, ठेवीदार आहेत. २५ कोटी ५२ लाखांच्या ठेवी असून, दोन कोटी ६८ लाख रुपये चालू वर्षासह व्याज आकारणी केलेली आहे. त्यानुसार २८ कोटी २० लाख रुपये देणे बाकी आहे. सहा कोटी ९० लाखांचे कर्ज वितरण केलेले असून, एक कोटी ६२ लाख रुपये व्याज आहे. एकूण आठ कोटी ५२ लाखांची कर्ज वसुली थकीत आहे. यात १९ कोटी ६८ लाखांच्या ठेवी कुठे गेल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जादा व्याज आकारणी आणि चुकीच्या नोंदीमुळे ही अनियमितता झाली आहे.
सोसायटीकडे केवळ ३५ लाखांची मालमत्ताअष्टविनायक सोसायटीच्या थकबाकीदारांकडून साडेआठ कोटींची वसुली करणे एक आव्हानच आहे. शिवाय ही वसुली १०० टक्के झाली, तरी खातेदारांना देय असलेल्या २८ कोटी २० हा लाखांची जुळवाजुळव अशक्य आहे. तब्बल १९ कोटी ६८ लाखांची तफावत असून, सोसायटीकडे केवळ नेर येथील इमारतच मालकीची आहे. त्याचे मूल्यांकनही ३५ लाखांपेक्षा अधिक नसल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.