अखेर साखर कारखाना विकला
By Admin | Updated: February 29, 2016 02:08 IST2016-02-29T02:08:59+5:302016-02-29T02:08:59+5:30
शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची अखेर थकीत कर्जापोटी राज्य बँकेने विक्री केली.

अखेर साखर कारखाना विकला
४३ कोटी ९५ लाख किंमत : उस्मानाबाद जिल्ह्यातील नॅचरल शुगरचा ताबा
महागाव : शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची अखेर थकीत कर्जापोटी राज्य बँकेने विक्री केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजनी येथील नॅचरल शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनीने हा कारखाना ४३ कोटी ९५ लाख रुपये किमतीत विकत घेतला.
पुसद-महागाव उपविभागातील शेतकरी कारखानदार व्हावा या उद्देशाने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने गुंज येथे सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला होता. या कारखान्यामुळे शेकडो हातांंना काम मिळाले होते. परंतु अंतर्गत राजकारण आणि विविध कारणांनी हा साखर कारखाना डबघाईस आला. अखेर त्यावर अवसायक नेमण्यात आला. राज्य बँकेने आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्यावर ताबा मिळविला. त्यानंतर या कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. २६ फेब्रुवारी रोजी कारखाना विक्रीची निविदा मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीत उघडण्यात आली.
कारखाना विक्रीची अपेक्षित किंमत राज्य बँकेने ४३ कोटी ६४ लाख रुपये ठेवली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजनी येथील नॅचरल शूगरने ४३ कोटी ९५ लाख रुपये रकमेची निविदा भरल्यामुळे हा कारखाना या कंपनीला विकला गेला. ४३ कोटी ९५ लाख रुपयांची मशनरी, कारखान्याची जमीन अन्य साहित्य विकले गेले आहे. विशेष म्हणजे या कंपनीने कर्मचारी पगार, अकृषक कराचा भरणा, पाणी कर अन्य देणे लावून घेतल्यामुळे खरेदीची किंमत ५३ कोटीपर्यंत गेली आहे. कारखाना खरेदीची एकच निविदा आल्यामुळे अपेक्षित किंमतीच्या आगावू रकमेचा भरणा केल्याने नॅचरल शूगरला हा कारखाना देण्यात आला.
नॅचरल शूगरही मोठी कंपनी असून कंपनीजवळ पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना आहे. या कारखान्याचे अनेक उत्पादनेही आहेत. त्याच धर्तीवर सुधाकरराव नाईक साखर कारखाना चालविण्याचा कंपनीचा मानस आहे. मुबलक पाणी आणि गाडी बैलाचे संपूर्ण क्षेत्र असल्याने या कारखान्यात पुढल्या वर्षीच उत्पादन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)
सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना
महागावपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर सुधाकरराव नाईक साखर कारखाना आहे. हा साखर कारखाना गत पाच वर्षांपासून बंद आहे. मध्यंतरी या कारखान्यावर आणलेली जप्ती शेतकऱ्यांनी हाणून पाडली होती. परंतु त्यानंतर मुंबईत झालेल्या बैठकीत उपविभागातील नेत्यांनी हा कारखाना राज्य बँकेच्या ताब्यात दिला. त्यांनी आपल्या थकीत कर्जासाठी कारखाना विक्रीस काढला. त्यावेळी नेत्यांनी या कारखान्याची विक्री होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. परंतु अखेर हा कारखाना खासगी कंपनीला विकला गेला.