अखेर प्रकाश देवसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली
By Admin | Updated: September 9, 2014 23:58 IST2014-09-09T23:58:59+5:302014-09-09T23:58:59+5:30
येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी अखेर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह नाईक घराण्यावरही तीव्र शब्दात

अखेर प्रकाश देवसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली
उमरखेड (कुपटी) : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी अखेर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह नाईक घराण्यावरही तीव्र शब्दात टीका केली.
वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश देवसरकर यांचे गेल्या काही दिवसांपासून तळ्यात की मळ्यात सुरू होते. त्यांचा उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्यांची कोंडी झाली होती. म्हणून यावेळी त्यांनी पुसद मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. म्हणून त्यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. २ सप्टेंबर रोजी त्यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच देवसरकरांनी राष्ट्रवादी सोडण्याची तयारी केली. अखेर मंगळवारी उमरखेडमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी गळ्यात भगवा दुप्पटा घालून शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले. १२ सप्टेंबर रोजी मुंबईत आपला शिवसेनेत अधिकृत प्रवेश होणार असल्याचे प्रकाश देवसरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
देवसरकर यांनी राष्ट्रवादी सोडताना शरद पवार, अजित पवार, मनोहरराव नाईक या नेत्यांवर कठोर शब्दात टीका केली. त्यांनी वेळोवेळी अपमान केल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)