अखेर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:23 IST2017-10-07T23:23:31+5:302017-10-07T23:23:42+5:30
नेत्यांमध्ये प्रचंड गटबाजी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात झारखंडचे निवडणूक निर्णय अधिकारी के.के. शुक्ला यांना यश आले आहे.

अखेर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नेत्यांमध्ये प्रचंड गटबाजी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात झारखंडचे निवडणूक निर्णय अधिकारी के.के. शुक्ला यांना यश आले आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी डॉ. वजाहत मिर्झा यांचा एकमेव अर्ज आल्याने आता त्यांच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे.
काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे पाच आमदार असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर आहे. सत्ता जाऊन पक्ष संपण्याची वेळ आली तरी नेते मंडळी गटबाजीचा मार्ग सोडण्यास तयार नाही. यापूर्वी येथील जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचा वाद मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचा नवा अध्यक्ष बिनविरोध निवडून आणणे हे मोठे आव्हान निवडणूक निर्णय अधिकाºयांपुढे होते. यवतमाळ जिल्ह्यातील निवडणुकीची जबाबदारी झारखंड येथील काँग्रेसचे नेते के.के. शुक्ला यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली होती. शुक्ला यांनी सुरुवातीपासूनच आपली ताठर भूमिका कायम ठेवली. त्यांनी नेत्यांमधील गटबाजी संपविण्याचे, या नेत्यांना एकत्र बसविण्याचेही प्रयत्न केले. अनेक बैठकांनंतर अखेर त्यांना यश आले.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, चार उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि २५ कार्यकारिणी सदस्य अशा सर्वच जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्याबाबतच अधिकृत घोषणा ११ आॅक्टोबरला मुंबईत प्रदेश काँग्रेस कमिटीकडून होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा अतिरिक्त प्रभार पुसद येथील डॉ. वजाहत मिर्झा यांच्याकडे आहे. मात्र जिल्हाध्यक्ष होण्यासाठी एका माजी मंत्र्यासह अनेकांनी मोर्चेबांधणी चालविली होती. त्यातून महिला कार्यकर्त्याही दूर नव्हत्या. यावेळी पुन्हा वाद वरपर्यंत जातो की काय, असे वाटत असतानाच जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात के.के. शुक्ला यशस्वी झाले. डॉ. मिर्झा यांचा एकमेव अर्ज आल्याने जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे.
जिल्हास्तरावरील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली आहे. त्याबाबत मुंबईतून घोषणा होणार असल्याने आपण काही बोलणे योग्य होणार नाही.
- के.के. शुक्ला (झारखंड)
जिल्हा निवडणूक
निर्णय अधिकारी, काँग्रेस.