अखेर खत घोटाळ्याची रक्कम भरली

By Admin | Updated: May 8, 2015 00:11 IST2015-05-08T00:11:02+5:302015-05-08T00:11:02+5:30

महागाव खरेदी विक्री संघात उघडकीस आलेल्या आठ लाखांच्या खत घोटाळ्यातील चार लाख ६५ हजार रुपयांची रक्कम ५ मे रोजी संबंधितांकडून भरून घेण्यात आली.

Finally, the amount of the fraud scam was filled | अखेर खत घोटाळ्याची रक्कम भरली

अखेर खत घोटाळ्याची रक्कम भरली

महागाव : महागाव खरेदी विक्री संघात उघडकीस आलेल्या आठ लाखांच्या खत घोटाळ्यातील चार लाख ६५ हजार रुपयांची रक्कम ५ मे रोजी संबंधितांकडून भरून घेण्यात आली. शेतकरी हिताच्या संस्थेत नातेसंबंध अधिक जोपासले जात असून शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण झालेल्या या संस्थेत अनागोंदी कारभार नित्याचाच झाला असल्याचे यावरून स्पष्ट होते.
सहकारी संस्थेमधून लाखो रुपयांचे घोटाळे उघड होत असताना सहकार विभाग मात्र डोळे मिटून बसला आहे. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचे खत घोटाळ्यात अर्थपूर्ण हितसंबंध आहे का, अशी शंका संचालकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे संस्थेच्या होवू घातलेल्या तातडीच्या बैठकीत अध्यक्ष दिगंबर पाचपोरे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येवू शकण्याची शक्यता काही संचालकांनी व्यक्त केली आहे. खरेदी विक्री संघाचे महागावसह हिवरा व काळी दौलत येथे कृषी माल विक्री केंद्र आहे. संघाची आधीच आर्थिक स्थिती खिळखिळी झालेली असताना आठ लाख रुपयांचा खत घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामुळे संस्थेचे आर्थिक नियोजन विस्कटले आहे. याचा फटका एकूणच येत्या खरीप हंगामावर जाणवणार आहे. खरेदी विक्री संघाच्या हिवरा शाखेच्या अध्यक्षांचे संबंधातील कर्मचाऱ्याने चार लाख ६५ हजारांचे खत विकले आहे. त्याची रक्कम मात्र अद्याप संस्थेच्या खात्यात भरली गेली नाही. हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा सदर कर्मचाऱ्याला पैसे भरण्याची ताकीद देण्यात आली. अस्थायी स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांच्या हाती लाखोंचा व्यवहार देण्यात आला असून खत विक्रीतून येणारी रोजच्या रोजची रक्कम संस्थेच्या खात्यात जमा होणे अनिवार्य आहे. परंतु संचालक मंडळ सोडले तर सारेच कर्मचारी प्रभारावर असल्यामुळे कुणालाच नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता वाटत नाही. घोटाळा करायचा आणि नंतर तो उघडकीस आल्यास रक्कम भरून द्यायची, हा काही व्यवहार होवू शकत नाही. त्यामुळे खत घोटाळ्याची जबाबदारी निश्चित करून अशा लोकांवर फौजदारीची कारवाई करावी, या मागणीसाठी संस्थेचे संचालक अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, सुनील भरवाडे आग्रही आहेत. त्यांनी खरीप हंगामाचे संस्थेने काय नियोजन केले आणि खत घोटाळ्यात फौजदारी कारवाई करणार की नाही याचा जाब विचारण्यासाठी तातडीच्या सभेची मागणी केली आहे. ९ मे रोजी संभाव्य बैठकीचे आयोजन असून घोटाळ्यात ज्या-ज्या संचालकांचा कवडीचाही संबंध नाही त्यांचेकडून अध्यक्षांच्या राजीनाम्याचा मागणी होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून शेतकरी हितासाठी असलेल्या महागाव खरेदी विक्री संघातील खत घोटाळाप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Finally, the amount of the fraud scam was filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.