अखेर मृत्यूनंतरच मिळाला शेतकऱ्याला न्याय

By Admin | Updated: October 11, 2015 00:38 IST2015-10-11T00:38:25+5:302015-10-11T00:38:25+5:30

गरिबीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याची जमीन सावकाराने हडपली. ती परत मिळविण्याची लढाई सुरू असतानाच त्याने हाताश होऊन आत्महत्या केली.

Finally, after the death, the judge got justice | अखेर मृत्यूनंतरच मिळाला शेतकऱ्याला न्याय

अखेर मृत्यूनंतरच मिळाला शेतकऱ्याला न्याय

अवैध सावकारीचे प्रकरण : जिल्हा उपनिबंधकांनी दिले शेत परत करण्याचे आदेश
अविनाश खंदारे उमरखेड
गरिबीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याची जमीन सावकाराने हडपली. ती परत मिळविण्याची लढाई सुरू असतानाच त्याने हाताश होऊन आत्महत्या केली. आता जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित अवैध सावकाराला शेतकऱ्याची जमीन परत करण्याचा आदेश दिला आहे. मात्र हा न्याय राजाराम तुकाराम भलगे या शेतकऱ्याला मरणोपरांत मिळाला आहे.
बिटरगाव येथील अल्प भूधारक (२ एकर ९ गुंठे) शेतकरी राजाराम तुकाराम भालगे यांची ही करुण कहाणी आहे. नापिकीमुळे त्यांनी संतोष खंडू पवार (रा. रतन नाईक बिटरगाव बु.) या सावकाराकडून २६ एप्रिल २०१३ रोजी एक लाख रुपये २५ टक्के वार्षिक व्याजाने घेतले होते. त्या मोबदल्यात शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर दोन एकर ९ गुंठे जमिनीचा करारनामा करण्यात आला. त्यात सवाई व्याज लावून जमीन परत खरेदी करून देण्याचे ठरले होते. त्यानुसार ९ मे २०१३ रोजी अवैध सावकाराच्या नावे खरेदीखत करुन देण्यात आले. त्यावर्षी राजाराम भलगे याने पैशाची जुळवाजुळव करून साक्षीदार शिवाजी खुपसरे यांना घेऊन सावकाराकडे गेले. त्यानंतर व्याजासह पैसे घ्या व माझ्या नावे जमीन परत करून द्या, अशी त्या सावकाराला विनवणी केली. त्या सावकाराकडे गावातील काही नागरिकही प्रस्ताव घेऊन गेले. पण त्याने सर्वच तडजोडीचे प्रस्ताव धुडकावून लावले व शेतकऱ्याला हाकलून लावले. शेवटी शेतकऱ्याने २१ फेब्रुवारी २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह उमरखेड तहसीलदार, सहायक निबंधक, बिटरगाव ठाणेदार यांच्याकडे तक्रार दिली होती. तक्रारीनंतर चौकशीतून हा व्यवहार अवैध असल्याचे निष्पन्न झाले. याच कार्यालयातील अच्युत भागानगरे यांनी ८ जून रोजी अवैध सावकाराविरोधात लेखी तक्रार दिली. त्यावरून बिटरगाव ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी अवैध सावकार संतोष पवार याच्यावर गुन्हा दाखल केला.
खरेदीखताचा हा व्यवहार अवैध सावकारीचा प्रकार असल्याचा अहवाल पोलिसांनी सहायक निबंधकांकडे दिला होता. या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींचा निष्कर्ष काढून बिटरगाव येथील शेतजमिनीचे (सर्व्हे नं. २१/३ जे ० हेक्टर ८९ आर) खरेदीखत अवैध असल्याचे दुय्यम निबंधकांनी घोषित केले होते. या अहवालानुसार जिल्हा निबंधक जितेंद्र कंडारे यांनी सदर मालमत्ता अर्जदाराचे वारस पत्नी कांताबाई राजाराम भलगे, मुलगा अमोल भलगे आणि मुलगी शितल भलगे यांना जमीन परत देण्याचा आदेश सावकाराला दिला आहे. परंतु, ही न्यायाची लढाई लढत असतानाच १६ जून २०१५ रोजी शेतकरी राजाराम भलगे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तरीही पत्नी कांताबाई यांनी धीर न सोडता अवैध सावकाराविरुद्ध लढाई सुरूच ठेवली. अखेर तिचा विजय झाला असून जिल्हा निबंधकांनी सावकाराला भलगे यांचे शेत परत करण्याचे आदेश दिले आहे.
शेती मिळाली, पण पती गेला
गरिबीमुळे राजाराम भलगे यांचा मुलगा अमोल याने बारावीनंतर शिक्षण सोडून दिले आहे. मुलगी शितल हिच्या लग्नाचाही प्रश्न आहे. अशावेळी त्यांची जमीनही सावकाराने हडपली. त्यामुळे त्यांचे जीवनच अधांतरी बनले होते. ही जमीन परत मिळविण्यासाठी आम्ही लढलो. पण शेवटी राजाराम यांनी जीवनयाता संपविली. त्यांच्या मृत्यूनंतर जिल्हा निबंधकांच्या आदेशाने जमीन परत मिळाली. पती मात्र कायमचा गेला, याची खंत कांताबाई भलगे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Web Title: Finally, after the death, the judge got justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.