उपनिबंधक पदासाठी नागपुरातून फिल्डींग
By Admin | Updated: December 6, 2015 02:35 IST2015-12-06T02:35:08+5:302015-12-06T02:35:08+5:30
जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) पदासाठी थेट नागपूरच्या वस्त्रोद्योग महामंडळातून मोर्चेबांधणी केली जात आहे.

उपनिबंधक पदासाठी नागपुरातून फिल्डींग
शिवसेनेचा ग्रीन सिग्नल : भाजपाचा विरोध, संघाची पसंती अतिरिक्त प्रभारालाच
यवतमाळ : जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) पदासाठी थेट नागपूरच्या वस्त्रोद्योग महामंडळातून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्याला शिवसेनेने पसंती दर्शविली असली, तरी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातून तेवढाच विरोध होत आहे.
जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांची जळगावच्या रायसोनी मल्टीस्टेट बँकेवर अवसायक म्हणून नियुक्ती झाली. ७ नोव्हेंबर रोजी त्यांना येथून कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा अतिरिक्त प्रभार यवतमाळच्या सहायक निबंधक अर्चना माळवे यांच्याकडे सोपविण्यात आला. दरम्यान रिक्त झालेल्या जिल्हा उपनिबंधक पदासाठी सहकार विभागातून अनेकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. त्यात नागपूरच्या वस्त्रोद्योग महामंडळातील एका अधिकाऱ्याचे नाव टॉपवर आहे. या अधिकाऱ्याने शिवसेनेमार्फत मोर्चेबांधणी चालविल्याचे सांगण्यात येते. सेनेनेही जिल्ह्यात सहकार क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने सहकारातील प्रमुख अधिकारी हाताशी असावा म्हणून वस्त्रोद्योगमधील अधिकाऱ्याच्या नावाला पसंती दर्शविली आहे. मात्र या नावाला भाजपाने तीव्र विरोध दर्शविला आहे. जिल्ह्यात शिवसेनेकडे पालकमंत्री पद असल्याने आधीच त्यांचे वर्चस्व आहे. या माध्यमातून प्रशासनावर पकड निर्माण केली जात आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न होत आहे. त्यातच उपनिबंधक सोईचा मिळाल्यास शिवसेना सहकार क्षेत्रातही आपले पाय रोवेल, अशी भीती भाजपाच्या स्थानिक नेत्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी वस्त्रोद्योगमधील अधिकाऱ्याच्या नावाला विरोध दर्शविल्याचे सांगितले जाते. त्यातच उपनिबंधकांचा अतिरिक्त प्रभार कायम राहावा अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काहींची इच्छा आहे. त्यामुळे संघानेही वस्त्रोद्योगमधील नावाला विरोध चालविला आहे. संघाचाच विरोध असल्याने भाजपाचाही विरोध पुढेसुद्धा कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपा-सेनेच्या या वादात वस्त्रोद्योगमधील फिल्डींग कमी पडण्याची व त्यातून आणखी काही महिने उपनिबंधकाचे पद संघाच्या सोईनुसार प्रभारी राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)