पांढुर्णा येथे पाण्यासाठी एकजुटीने लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 22:27 IST2019-05-08T22:27:22+5:302019-05-08T22:27:43+5:30
पावसाचे पाणी अडवून भविष्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी व दुष्काळासोबत लढा देण्याकरिता एकजूट झालेल्या पांढुर्णा खुर्द येथील ग्रामस्थांच्या लढ्यात आमदार राजू तोडसामही सहभागी झाले. त्यांनी गावकऱ्यांसोबत महाश्रमदान केले.

पांढुर्णा येथे पाण्यासाठी एकजुटीने लढा
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : पावसाचे पाणी अडवून भविष्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी व दुष्काळासोबत लढा देण्याकरिता एकजूट झालेल्या पांढुर्णा खुर्द येथील ग्रामस्थांच्या लढ्यात आमदार राजू तोडसामही सहभागी झाले. त्यांनी गावकऱ्यांसोबत महाश्रमदान केले.
श्रमदानात प्रत्येकाने सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा, याकरिता महाराष्ट्र दिनी पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. जल व मृदा संधारणाच्या या चळवळीला अधिक गती प्राप्त होऊन दुष्काळाशी लढण्यासाठी ग्रामस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून आमदार राजू तोडसाम यांनीही सहकाऱ्यांसह महाश्रमदानात भाग घेतला.
श्रमदानात गटशिक्षणाधिकारी मनू पखाले, शिक्षण विस्तार अधिकारी साधना चौधरी व सहकारी कर्मचारी, विकासगंगा संस्थेचे अध्यक्ष रंजित बोबडे, सुभाष मानकर, प्रशांत उगले, मोरेश्वर वातीले, अनुप लोणकर, अमित गाडबैल, आकाश बुरेवार आदींसह नागरिकांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी कंपार्टमेंट बंडीग व सलग समतल चर तयार केले. जलसंधारणासाठी गावात मोठ्या प्रमाणात बांध-बंदिस्ती, शेततळे, माती नाला बांध, दगडी बांध, सलग समतल चर तयार करणे सुरू आहे. गावकºयांना मुबलक प्रमाणात जलसाठा उपलब्ध होण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने विकासगंगा संस्थेद्वारा गावात तलावाचे खोदकाम सुरू आहे.
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून पाठिंबा मिळत असून शासकीय व निमशासकीय पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, कुंभारी व घाटंजी येथील नागरिकांनी श्रमदानात सहभाग घेत गावकºयांचा उत्साह वाढविला.