४२ डिग्री तापमानात एसटी कामगारांचा न्यायासाठी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:16 IST2019-04-13T22:15:45+5:302019-04-13T22:16:38+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरूद्ध कामगारांनी तप्त उन्हात उपोषण सुरू केले आहे. ४२ डिग्री तापमानाने शरीराची काहिली होत असताना कामगार आपल्या हक्कासाठी लढा देत आहे.

४२ डिग्री तापमानात एसटी कामगारांचा न्यायासाठी लढा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरूद्ध कामगारांनी तप्त उन्हात उपोषण सुरू केले आहे. ४२ डिग्री तापमानाने शरीराची काहिली होत असताना कामगार आपल्या हक्कासाठी लढा देत आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पुढाकारात शुक्रवारपासून विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
ज्येष्ठता डावलून नियमबाह्य करण्यात आलेल्या बदल्या, खात्यामार्फत बढतीवर पदोन्नती, चालक-वाहकांना रात्रमुक्कामी व्यवस्था, विश्रांतीगृहातील गैरसोय, चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांचे ग्रेडेशन, वार्षिक वेतनवाढ वेळेवर न काढणे, हुकुमशाही धोरण, बदलीत मनमानी, ज्येष्ठता डावलून तसेच दोन-तीन महिने गैरहजर कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेचा विचार न करता नेमणूक, कायदे करार व परिपत्रकाचा भंग या व इतर प्रश्नांसाठी संघटनेने पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. यामुळे संघटनेने उपोषण सुरू केले आहे. विभागीय सचिव राहुल धार्मिक यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात सदाशिव शिवरकर, योगेश रोकडे, हरिदास सहारे, गजेंद्र उमक, अमोल लढी, उत्तम पाटील, गजानन झुंजारकर, नितीन चव्हाण, शे. लाल आदी सहभागी झाले.
एसटी प्रशासनाने दखल न घेतल्यास १५ एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे. कामगारांच्या प्रश्नांविषयी महामंडळ गंभीर नाही. उपोषणात ७०० ते ८०० कामगार सहभागी होतील असे राहुल धार्मिक यांनी कळविले आहे.
आचारसंहितेत उपोषण कसे?
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. तरीही आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हा प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याचे मत काही कामगार संघटनांकडून व्यक्त होत आहे. सदर आंदोलन नियमबाह्य आहे काय आणि असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असा या संघटनांचा सूर आहे.
विभाग नियंत्रकांनी बदल्या आणि बढत्याचा लावलेला सपाटाही संशयाच्या भोवºयात आहे. बदल्यांमध्ये अन्याय करायचा आणि हा अन्याय दूर करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरायच्या असा नवीन प्रयोग विभाग नियंत्रकांनी सुरू केला असल्याचा आरोप होत आहे.