शेतकऱ्यांनी भरले सव्वा कोटी
By Admin | Updated: August 13, 2014 00:00 IST2014-08-13T00:00:59+5:302014-08-13T00:00:59+5:30
शासनाने यावर्षी नव्याने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. विविध बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा रकमेची सक्तीने कपात करण्यात आल्याने यावर्षी तालुक्यातील

शेतकऱ्यांनी भरले सव्वा कोटी
पीक विमा : नुकसानग्रस्तांच्या पदरी मात्र निराशाच
देवेंद्र पोल्हे - मारेगाव
शासनाने यावर्षी नव्याने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. विविध बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा रकमेची सक्तीने कपात करण्यात आल्याने यावर्षी तालुक्यातील ४ हजार ७६९ शेतकऱ्यांनी तब्बल १ कोटी १६ लाख २६ हजार ५५१ रूपयांच्या विमा हप्त्याचा भरणा केला आहे़
शेतकऱ्यांच्या शेतमालाची अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामूहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने शासनाने राज्यात सन १९९९-२००० पासून ही योजना लागू केली़ महसूल मंडळ युनिट गृहीत धरून त्यातील पूर्ण क्षेत्रीय स्तरावर सरासरी उत्पादनाच्या आधारावर पीक विमा निश्चित केला जातो़ परंतु जिल्ह्यात पीक विमा योजना सुरू झाल्यानंतर सुरूवातीची काही वर्षे सोडल्यास, ही योजना शेतकऱ्याच्या हिताची, की विमा कंपनीच्या हिताची, अशा चर्चा सुरू झाली आहे.
तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर हे मुख्य पीक आहे़ परंतु गेल्या १० वर्षांत या पिकांना कधीच पीक विमा लागू झाला नाही, असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. गेल्यावर्षी तर विमा कंपनीने हद्दच केली़ ज्वारीची मागणी घटल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेणे जवळपास बंदच केले आहे़ परंतु विमा कंपनीने तालुक्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांना विमा न देता, तालुक्यात ज्वारीच्या पिकाला विमा लागू केला़ त्यामुळे अल्प शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ झाला़ वास्तविक ज्या शेतकऱ्यांना ज्वारीचा पीक विमा मिळाला, त्या शेतकऱ्यांनीही ज्वारीची पेरणीच केली नव्हती़
यावर्षी शासनाने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेसोबतच हवामानावर आधारित पीक विमा शेतकऱ्यांसाठी लागू केला. ही योजना बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सक्तीची करण्यात आली. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून पीक विम्याचा हप्ता बळजबरीने कापून घेण्यात आला.
पीक विमा योजनेचा लाभ होत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे कापून घेण्यास विरोध केला़
तथापि पीक विमा काढल्याशिवाय कर्ज मिळणार नाही, अशी भूमिका बँकांनी घेतल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना विमा हप्त्याचे पैसे भरावे लागले़ मात्र विमा हप्ता भरूनही कपाशी, सोयाबीनसारख्या पिकांना त्याचा लाभ होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या दोनही पिकांचे नकुसान होऊनही त्यांच्या पदरी मात्र निराशाच येत आहे.