The fifth day of the corona eruption in the district is permanent | जिल्ह्यात पाचव्या दिवशीही कोरोनाचा उद्रेक कायमच

जिल्ह्यात पाचव्या दिवशीही कोरोनाचा उद्रेक कायमच

ठळक मुद्दे२१५ नव्या रुग्णांची भर : एकाचा मृत्यू, ५६ जण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची लाट आली आहे. सलग पाचव्या दिवशीही दोनशेच्यावर रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे. बुधवारी सायंकाळी प्राप्त अहवालात २१५ नवे रुग्ण आढळून आले. तर यवतमाळ शहरातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. 
बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या २१५ जणांमध्ये १२१ पुरुष तर ९४ महिला आहेत. यात यवतमाळातील १००, दारव्हा २८, पुसद २२, दिग्रस १७, पांढरकवडा १६, वणी १२, नेर १०, झरीजामणी तीन, बाभूळगाव, उमरखेड येथे प्रत्येकी दोन, आर्णी, राळेगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. बुधवारी एक हजार २७१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये २१५ जण पॉझिटिव्ह निघाले तर एक हजार ५६ निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २९६ इतकी झाली आहे. आतापर्यंत १६ हजार ७१६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ९६९ इतकी आहे. कोरोनाने ४५१ जणांचा जिल्ह्यात बळी घेतला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एक लाख ५६ हजार ७०१ नमुने तपासणीला पाठविले आहेत. यापैकी एक लाख ३८ हजार ८८३ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एक हजार १२२ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.  प्रत्येक तालुक्यामध्ये कोरोना तपासणी करण्यावर अधिक भर दिला जात आहे. एका केंद्रावर दिवसाला ५०० जणांचे नमुने घेण्याची सक्ती केली आहे. 
कोरोना लसीकरणात पोलीस कर्मचाऱ्यांची आघाडी 
 जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी स्वत: बुधवारी कोरोनाची लस घेतली. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागासह महसूल, पोलीस, नगरपालिका यंत्रणा, पंचायतराज व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी यांना लस दिली जात आहे. आतापर्यंत ५७ टक्के लसीकरण झाले असून यामध्ये पाेलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी आघाडीवर आहेत. नोंदणी असलेल्या इतरांनीही लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
आर्णी तालुक्यातील जवळा प्रतिबंधित क्षेत्र
 आर्णी तालुक्यातील जवळा येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याने त्या गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या गावाच्या सीमा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आल्या आहेत. गावात जाण्यासाठी तेथे असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाच मुभा राहील. तर अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना पासेसशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. या पासेस संबंधित पोलीस ठाण्यातून देण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग नियंत्रण अधिनियम यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. 

 

Web Title: The fifth day of the corona eruption in the district is permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.