सेमिनरी ले-आऊटमध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा
By Admin | Updated: September 28, 2016 00:18 IST2016-09-28T00:18:52+5:302016-09-28T00:18:52+5:30
घरमालकीन आणि मोलकरणीला बांधून सहा सशस्त्र दरोडेखोरांनी भरदुपारी सिनेस्टाईल दरोडा टाकल्याची घटना येथील वाघापूर मार्गावरील सेमिनरी ले-आऊटमध्ये घडली.

सेमिनरी ले-आऊटमध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा
दोन महिलांना घरातच बांधले : दरोडेखोर इम्पोर्टेड रिव्हॉल्वर घटनास्थळीच विसरले
यवतमाळ : घरमालकीन आणि मोलकरणीला बांधून सहा सशस्त्र दरोडेखोरांनी भरदुपारी सिनेस्टाईल दरोडा टाकल्याची घटना येथील वाघापूर मार्गावरील सेमिनरी ले-आऊटमध्ये घडली. यातील दरोडेखोर इम्पोर्टेड रिव्हॉल्वर घटनास्थळीच विसरले, हे विशेष! या घटनेने शहरात एकच खळबळ उडली आहे. यात किती मुद्देमाल चोरी गेला हे मात्र वृत्तलिहेस्तोवर जाहीर केले नव्हते.
सेमिनरी ले-आऊट परिसरात अनिल जवेरीलाल खिवसरा यांचे घर आहे. मंगळवारी दुपारी निर्मला अनिल खिवंसरा (४९) आणि त्यांची मोलकरीण प्रेमिला भीमराव मडावी या दोघीच घरी होत्या. दुपारी ३.१५ वाजताच्या दरम्यान दोन तरुणांनी घराचा मुख्य दरवाजा ठोठावला. दार उघडताच ‘मटीरिअल के पैसे लेना है, भैय्या घर पर है क्या’ असे त्या दोघांनी विचारले. मात्र नंतर निर्मला यांचे तोंड दाबून चाकूच्या धाकावर घरात आणले. तसेच दुसऱ्या साथीदाराने मोलकरीण प्रेमिलाही चाकूच्या धाकावर सोफ्यावर बसविले. त्यानंतर पॅकिंग पट्टीने दोनही महिलांचे हातपाय व तोंड बांधले. घरातील कपाट फोडून मुद्देमालाचा शोध घेतला. दरोडेखोरांनी काही सोन्याच्या अंगठ्या, चिल्लर नोटांचे बंडल त्यांनी जागेवरच सोडून दिले. त्यानंतर देवघरातील आलमारी उघडून शोधाशोध केली. त्यानंतर दरोडेखोर घरातून निघून गेले. निर्मला खिवंसरा यांनी कशीबशी सुटका केली. त्यावेळी घरात एक कॅरिबॅगमध्ये एका कागदात गुंडाळलेली इम्पोर्टेड रिव्हॉल्वर दिसले. रिव्हॉल्वर घेण्यासाठी दरोडेखोर परत येतील, अशी त्यांना धास्ती होती. दरम्यान मोलकरणीचे हातपाय सोडले. घटनेची माहिती बाभूळगाव येथे गेलेले पती अनिल खिवंसरा यांना दिली. त्यानंतर तातडीने पोलीस व खिवंसरा कुटुंबियांचे नातेवाईक घटनास्थळावर पोहोचले. आरोपी सहा असल्याचे सांगितले जात आहे. एक आरोपी फाटकावर उभा होता. तर दोघे आतमध्ये शिरले आणि रस्त्यावर काही आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी घरात प्रवेश करताना चेहरा उघडाच ठेवला होता. उलट घराबाहेर पडताना त्यांनी गळ्यातील शेल्याने तोंड झाकण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण करून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वान काही अंतरापर्यंत गेल्यानंतर घुटमळले. आरोपी विसरलेल्या रिव्हॉल्वरचाही गंध श्वानाला देण्यात आला. त्यानंतरही फार सुगावा लागला नाही. पोलिसांनी विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष केंद्रीत केले आहे. चिद्दरवार यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाल रंगाची एम.एच.३१ पासिंग असलेली क्वॉलिस गाडी आली आहे. पोलीस सध्या या वाहनाचा तपास घेत आहे. या प्रकरणी निर्मला खिवसरा यांनी तक्रार दिली. घटनास्थळावर डीवायएसपी पीयूष जगताप, एलसीबीचे निरीक्षक संजय देशमुख, शहर ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार पंत आदींनी भेट दिली. (कार्यालय प्रतिनिधी)
शेजाऱ्यांनी ऐकला आवाज
मुझे मारो मत, छोड दो असा आवाज शेजारी असलेल्या महिलेला ऐकायला आला. मात्र लहान मुलाला कुटुंबातील कोणी ज्येष्ठ रागावत असेल म्हणून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आरोपींनी निर्मला खिवंसरा यांच्याशी झटापट केली तेव्हा त्यांनी आरोपींना मारो मत, छोड दो अशी गयावया केली होती.