विनातिकीट प्रवासी आढळताच महिला वाहक बेशुद्ध
By Admin | Updated: September 25, 2015 03:10 IST2015-09-25T03:10:07+5:302015-09-25T03:10:07+5:30
सायंकाळी ७ वाजताची वेळ. पुलगाववरून आलेली एसटी बस बसस्थानकात थांबली. तेवढ्यात तपासणी पथकाचे वाहन आले.

विनातिकीट प्रवासी आढळताच महिला वाहक बेशुद्ध
बाभूळगाव बसस्थानक : एसटीसह तपासणी पथक रुग्णालयात
आरिफ अली बाभूळगाव
सायंकाळी ७ वाजताची वेळ. पुलगाववरून आलेली एसटी बस बसस्थानकात थांबली. तेवढ्यात तपासणी पथकाचे वाहन आले. प्रवाशांची तपासणी सुरू असताना पाच जण विनातिकीट आढळले. महिला वाहकाला जाब विचारणार तोच ती बेशुद्ध होऊन पडली. तपासणीचे काम सोडून एसटीसह तपासणी पथक थेट बाभूळगावच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचली. या घटनेची चर्चा संपूर्ण शहरभर झाल्याने रुग्णालयातही बघ्यांची गर्दी झाली.
पुलगाववरून यवतमाळकडे प्रवासी घेऊन निघालेली एसटी बस बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बाभूळगाव बसस्थानकावर आली. त्याच वेळी एसटीचे तपासणी पथक टाटासुमो वाहनातून पोहोचले. एसटीतील प्रवाशांची तपासणी सुरू झाली. त्या दरम्यान पाच जण विनातिकीट आढळले. याबाबत महिला वाहकाला जाब विचारणार तोच ती बेशुद्ध पडली. पथकातील अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. बससह तपासणी पथक थेट बाभूळगावच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. बस आणि टाटासुमो रुग्णालयात आल्याने नागरिकांची गर्दी झाली. महिला वाहकावर तत्काळ उपचार सुरू झाले. काही वेळानंतर डॉक्टरांनी यवतमाळला जाण्याचा सल्ला दिला. महिला वाहकाला यवतमाळला घेऊन जाण्याची तयारी सुरू असताना तपासणी पथक मात्र चालकाचे बयान घेण्यात व्यस्त होते. बयाण आटोपल्यानंतर उपचारासाठी यवतमाळला रवाना करण्यात आले.
बसमध्ये विनातिकीट प्रवासी आढळल्यास त्याचा ठपका वाहकावर ठेऊन त्याच्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे विधवा असलेली ही महिला वाहक घाबरली असावी आणि कारवाईच्या भीतीने बेशुद्ध पडली असावी. मात्र या घटनेची चर्चा सध्या चांगलीच रंगत आहे.