अन्नपूर्णाच्या कुटुंबावर मदतीचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:11 IST2017-12-10T23:10:54+5:302017-12-10T23:11:14+5:30
दिव्यांग असलेले आई-वडील आणि घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून भीक मागण्याची वेळ आलेल्या दारव्हा येथील अन्नपूर्णा शिंदेच्या परिवारावर अक्षरश: मदतीचा वर्षाव झाला.

अन्नपूर्णाच्या कुटुंबावर मदतीचा वर्षाव
आॅनलाईन लोकमत
दारव्हा : दिव्यांग असलेले आई-वडील आणि घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून भीक मागण्याची वेळ आलेल्या दारव्हा येथील अन्नपूर्णा शिंदेच्या परिवारावर अक्षरश: मदतीचा वर्षाव झाला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच समाजातील दानशूर व्यक्तींनी मानवतेचे दर्शन घडविले.
‘लोकमत’मध्ये शनिवारच्या अंकात ‘सातव्या वर्गातल्या ‘अन्नपूर्णे’वर भीक्षा मागण्याची वेळ’ असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताने समाजमन गहिवरून गेले. अन्नपूर्णा शिंदे आणि तिच्या परिवाराच्या मदतीसाठी अनेक जण धावून आले. शिवसेना पदाधिकाºयांनी या कुटुंबाला भरीव मदत केली. तसेच अनेकांनी तिच्या घरी जाऊन आर्थिक मदतही केली. येथील शिवनगरात राहणारे अन्नपूर्णाचे वडील दोनही डोळ्यांनी अंध आहे. तर आई पोलिओमुळे लुळी झाली आहे. अशा परिस्थितीत अन्नपूर्णा वडिलांना भीक मागण्यासाठी मदत करीत होती. यासाठी तिला शाळाही सोडावी लागली. तिची ही कहानी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या सूचेनवरून शिवसेना पदाधिकाºयांनी अन्नपूर्णाचे घर गाठले. तिच्या अडचणी जाणून घेतल्या. नगरसेवक शरद गुल्हाने यांनी निराधार खात्यात किमान बचत ठेव म्हणून तत्काळ मदत केली. तसेच छोटा व्यवसाय म्हणून गोळ्या-बिस्कीटचे दुकान लावून देण्याची व्यवस्था केली. प्रेमसिंग चव्हाण, पंचायत समिती उपसभापती पंडित राठोड, नामदेव जाधव यांनी पीठगिरणी व्यवसाय सुरू करण्याची व्यवस्था केली. रवी वांड्रसवार यांनी सायकल भेट दिली. नगरपरिषद सभापती रवी तरटे यांनी कुटुंबातील प्रत्येकाला कपडे तर गजेंद्र चव्हाण यांनी अन्नपूर्णाच्या शिकवणीच्या फीची व्यवस्था केली. राम मते यांनी दोनही मुलींना ड्रार्इंगचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले.
शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज सिंगी, नगरसेवक प्रकाश गोकुळे आदींनी मदतीचा हात पुढे केला. चैतन्य ग्रुपचे गणेश भोयर, ओंकार निमकर, गणेश पुसदकर, राहुल बोरकर यावेळी उपस्थित होते. त्याच सोबत घाटंजीच्या विकास गंगा संस्थेचे अध्यक्ष रणजित बोबडे, विनोद गुजलवार, विजय गरड, अनिकेत संस्था दिग्रसचे रवी राऊत, स्वीकार अॅग्रो प्रोड्युसरचे अध्यक्ष सुधाकर दरेकार आदींनी भेट घेऊन केअरिंग फ्रेन्डस् मुंबईच्या सहकार्याने छबूताई बोबडे यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश दिला. यवतमाळ येथील उद्धार संस्थेचे समिश नाठार, रवींद्र तिवारी यांनी रोख चार हजार रुपये, पुसदचे संजय आसोले, उत्तमलाल रामधनी, दारव्हा येथील राहुल मते यांनी रोख मदत केली. तसेच शैक्षणिक साहित्य व शालेय पोषाख देण्याचे आश्वासन दिले.
माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष अशोक चिरडे, डॉ. मनोज राठोड, डॉ. रुपेश खंदाडे, वाशिमचे डॉ. राहुल महाले, गजानन दुधे, प्रभाकर माकोडे, वैभव भेंडे यासह अनेकांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी संपर्क साधून मदतीची तयारी दर्शविली. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने शिंदे कुटुंबियांना मदतीचा हात मिळाला. ‘लोकमत’प्रती शिंदे परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली.