‘स्वाईन फ्लू’च्या भीतीने सर्वच गंभीर
By Admin | Updated: February 19, 2015 00:09 IST2015-02-19T00:09:52+5:302015-02-19T00:09:52+5:30
शेजारी जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. यवतमाळ जिल्ह्यातही स्वाईन फ्लूची एन्ट्री होण्याची हुरहूर लागल्याने मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासन व ...

‘स्वाईन फ्लू’च्या भीतीने सर्वच गंभीर
यवतमाळ : शेजारी जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. यवतमाळ जिल्ह्यातही स्वाईन फ्लूची एन्ट्री होण्याची हुरहूर लागल्याने मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासन व आरोग्य यंत्रणा असे सर्वच जण गंभीर झाले आहेत. स्वाईन फ्लूचा शिरकाव होऊ नये आणि झालाच तर त्याला कसे निपटवायचे या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे.
स्वाईन फ्लूच्या भीतीने जिल्ह्यात आरोग्य विभागाने नियंत्रण कक्ष उघडला आहे. १३ फेब्रुवारीला सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड यांनी आढावा बैठक घेतली. बुधवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा पार पडली. त्यात स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रकर्षाने चर्चा करण्यात आली. स्वाईन फ्लूबाबत जनजागृती निर्माण करण्याचे निर्देश आरोग्य सभापतींनी दिले. नागरिकही स्वाईन फ्लूबाबत सतर्क आहेत. कुण्या रुग्णावर संशय आल्यास नागरिक स्वत:च आरोग्य विभागाला फोन करून सांगत असल्याची माहिती डीएचओ राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली. १३ फेब्रुवारीला कवठा येथे संशयित रुग्ण आढळला होता. मात्र पुण्यावरून आलेल्या तपासणी अहवालाअंती तो स्वाईन फ्लूचा रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही गांभीर्य ओळखून स्वाईन फ्लूवर सविस्तर आढावा बैठक घेतली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी खासगी डॉक्टरांची या विषयावर कार्यशाळा घेऊन संशयित रुग्ण आढळल्यास आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्याचे सूचित केले. खबरदारी म्हणून वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात चार खाटांचा अतिदक्षता कक्ष उघडण्यात आला आहे. तेथे संपूर्ण व्यवस्था तैनात ठेवण्यात आली ंआहे. ग्रामीण रुग्णालयांमध्येही प्रतिबंधक औषधी उपलब्ध आहेत. आरोग्य केंद्रात मात्र या औषधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश नाहीत. तेथे असा रुग्ण आल्यास तत्काळ रेफर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. आरोग्य खात्याच्या प्रधान सचिव सुजाता सैनिक यांनी बुधवारी दुपारी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडून स्वाईन फ्लू उपाययोजनांचा आढावा घेतल्याचे डॉ.के.झेड. राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)