जिंदो से डर, मुर्दो से क्या डरना - रजीया बी रमजान शाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:07+5:30
मला समाजातील जिवंत माणसांची भीती वाटते. मृत माणसांची भीती काय आहे? मला मुर्द्याजवळ रखवाली कर अथवा झोप म्हटले तरी मी त्या मुर्द्याच्या अंगावर हात ठेवून बिनधास्त झोपू शकते. जिंदो से डर, मुर्दोसे क्या डरना? मुझे डर नही लगता. ये सारी वहेम की बाते है.

जिंदो से डर, मुर्दो से क्या डरना - रजीया बी रमजान शाह
माझ्या दिवसाची सुरूवात स्मशानभूमीत होते आणि माझी रात्रही प्रेतांच्या सोबतीत असते - रजीया बी रमजान शाह, स्मशानातील महिला सेवेकरी
रुपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दांडगी हिंमत असणाऱ्या महिला समाजात वावरताना आपण पाहतो. मात्र स्मशान म्हटल तर भल्या भल्यांना भीती वाटते. स्मशानातून घरी परतताना प्रथम अंघोळ केली जाते. नंतरच घरात प्रवशे मिळतो. असे असले तरी एक महिला सेवेकरी अक्षरश: प्रेतांची सेवा करते. रजीया बी रमजान शाह हे तिचे नाव. या महिलेचा दिवस स्मशानात उगवतो आणि रात्रही स्मशानातच जाते. असे आगळेवेगळे जीवन जगणाºया महिलेचे धाडस कसे असावे, यासंदर्भात रजीया बी रमजान शाह यांच्याशी साधलेला संवाद...
किती वर्षांपासून स्मशानात सेवेकरी म्हणून काम पाहात आहात?
गत २७ वर्षांपासून मी स्मशानातच राहते. या ठिकाणी प्रेतांना सेवा देण्याचे माझे व्रत अखंड सुरू आहे. मुर्द्यांचे कपडे जमा करणे, जाळणे, ओटा लिंपणे, त्यावर झाडूपोचा करणे, रात्री कितीही वाजता मयत आली तरी त्याची रजिस्टरमध्ये नोंद करणे. प्रेत जळते आहे की नाही, याकडे लक्ष ठेवणे ही कामे मी स्वत: करीत आली आहे. आजही करीत असते.
स्मशानात तुम्हाला भीती वाटत नाही काय?
मला समाजातील जिवंत माणसांची भीती वाटते. मृत माणसांची भीती काय आहे? मला मुर्द्याजवळ रखवाली कर अथवा झोप म्हटले तरी मी त्या मुर्द्याच्या अंगावर हात ठेवून बिनधास्त झोपू शकते. जिंदो से डर, मुर्दोसे क्या डरना? मुझे डर नही लगता. ये सारी वहेम की बाते है.
भूत, प्रेत आणि पेटत्या चिता अस्वस्थ करतात काय?
मी लहान होते तेव्हा प्रेताची चिरफाड होत होती, त्या ठिकाणी जाऊन येत होती. घरचे सारेच मला रागावत होते. ओरडत होते. माझी हिंमत दांडगी आहे. खरे पाहिले तर भूत, प्रेत, पेटत्या चिता याबाबत समाजात भ्रम निर्माण केला जातो. मात्र तसे काही नाही. अशा कुठल्याही गोष्टी नसतात. हा आपला भ्रम आहे. स्मशानातली शांतता मनाला सुख देणारी आहे. माझी सेवा मी अखंड सुरू ठेवणार आहे.
जात, धर्म, पंथ यामध्ये संपूर्ण समाज विखुरला जातो. मात्र मृत्यूनंतरच मानवता कळते. माझ्या दृष्टीने मानवताच महत्त्वाची आहे. कोणी आत्महत्या केली, नैसर्गिक मृत्यू, अपघात, विविध प्रकारच्या घटनेनंतर मृतदेह स्मशानात येतात. मी अंतिम संस्कार पूर्ण करते.
अंतरजातीय विवाह केला म्हणून कुटुंबाने नाकारले
मी अंतरजातीय विवाह केला. तेव्हापासून साऱ्यांनीच माझ्याकडे पाठ फिरवली. माझ्या पतीने आणि मी स्मशानात राहण्याचे आणि सेवा करण्याचे ठरविले. तेव्हापासून आम्ही स्मशानातच आहोत. आज माझे पती गेले. मात्र मी माझ काम चोखपणे पार पाडते आहे. मला मृत्यूची भीती नाही. मृतात्म्याची, भूतांची भीती नाही. जिवंत माणसांची भीती वाटते. माझ्या मुलांना आणि नातवंडांनाही मी मजबूत बनविण्याचे काम केले आहे. कोणाशी देणे घेणे नाही. कुठली कुरबुर नाही. मी सेवेकरी आहे.