पाच लाख टन ऊस वाळण्याची भीती
By Admin | Updated: November 8, 2014 01:46 IST2014-11-08T01:46:54+5:302014-11-08T01:46:54+5:30
१०० वर्षात प्रथमच पैनगंगा हिवाळ््यात आटली. याचा फटका तालुक्यातील सर्वांना बसणार असून, सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

पाच लाख टन ऊस वाळण्याची भीती
अविनाश खंदारे उमरखेड (कुपटी)स
१०० वर्षात प्रथमच पैनगंगा हिवाळ््यात आटली. याचा फटका तालुक्यातील सर्वांना बसणार असून, सर्वाधिक फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. पैनगंगाच्या आशेवर लागवड केलेला पाच लाख टन ऊस काढणीपूर्वीच वाळण्याची भिती निर्माण झाली आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. ही नदी दोन्ही प्रदेशासाठी जीवनदायिनी आहे. नदीच्या दोन्ही तीरावर शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टअरवर ऊसची लागवड केली आहे. सध्या पाच लाख टन ऊस पैनगंगेच्या तीरावर आहे. परंतु हिवाळ््यातच पैनगंगा आटल्याने याचा फटका ऊसला बसणार आहे. पाण्याच्या योग्य पाळ्या न मिळाल्यास ऊस वाळण्याची शक्यता आहे.
पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना, गुंज येथे पुष्पावंती साखार कारखाना आणि मराठवाड्यात जयवंत साखर कारखाना असे तीन साखर कारखाने आहेत. गुंज व मराठवड्यातील साखर कारखाना बंद आहे. पैनगंगेच्या आशेवर विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो शेतकऱ्यांनी ऊसची लागवड केली आहे. वसंत साखर कारखान्याचा गळीप हंगाम लवकरच सुरू होणार आहे. परंतु कामगारांनी गुरूवारपासून आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. त्यामुळे हा कारखाना कधी सुरू होईल याची चिंता शेतकऱ्यांना आहे. अशा स्थितीत पाच लाख टन ऊस उभा आहे. या उसाची योग्यवेळी तोड झाली नाही तर वजन घटते, तसेच योग्य प्रमाणात पाणी मिळाले नाही तर ऊस वाळतोही.
शेतकऱ्यांनी पैनगंगेच्या आशेवर मोठ्या प्रमाणात ऊस लावला. परंतु आता हिवाळ््यात पैनगंगा आटली आहे. कारखान्याच्या गळीप हंगामाचा भरवसा नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती आहे.
पाच लाख टन ऊस
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी पैनगंगेच्या आशेवर पाच लाख टन उसाची लागवड केली आहे. त्यात ढाणकी विभागात ६१ हजार टन, मुळावा ३६ हजार, कुपटी ३३ हजार टन, कारखेड ५० हजार टन, यासह विदर्भ आणि मराठवाड्यात असा पाच लाख टन ऊस उभा आहे.