वडिलाने केला दारूड्या मुलाचा खून

By Admin | Updated: October 25, 2014 01:45 IST2014-10-25T01:45:50+5:302014-10-25T01:45:50+5:30

दारूच्या नशेत त्रास देणाऱ्या मुलाचा वडिलानेच कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही घटना येथील सुराणा ले-आऊटमध्ये गुरुवारी पहाटे घडली.

The father killed the drunken child | वडिलाने केला दारूड्या मुलाचा खून

वडिलाने केला दारूड्या मुलाचा खून

यवतमाळ : दारूच्या नशेत त्रास देणाऱ्या मुलाचा वडिलानेच कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही घटना येथील सुराणा ले-आऊटमध्ये गुरुवारी पहाटे घडली. आरोपी वडिलाला शहर पोलिसांनी अटक केली.
बंडू हरिदास मेश्राम (४०) असे मृत मुलाचे नाव आहे. तर हरिदास शंकर मेश्राम (६७) असे आरोपी पित्याचे नाव आहे. बंडू हा नेहमी दारूच्या नशेत राहून घरच्यांना त्रास देत होता. बुधवारी रात्री तो नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला. दिवाळीचा दिवस असतानाही दारूच्या नशेत त्याने आई-वडिलांसोबत वाद घालणे सुरू केले. आई वडिलांना मारहाण करण्यासाठी बंडू उठला. त्याला वारंवार समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्बल दोन ते तीन तास त्याचा घरी धिंगाणा सुरू होता. बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास बंडू पुन्हा वडिलांवर चालून गेला. नेहमीचा हा त्रास कायमचा संपवावा म्हणून वडिलांनी हातात कुऱ्हाड घेतली आणि बंडूच्या मानेवर घाव घातले. काही क्षणातच बंडू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. बंडूची आई सत्यभामा हरिदास मेश्राम (६०) हिने शहर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आरोपी हरिदास मेश्राम याने रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन शहर ठाण्यात आत्मसमर्पण केले.
बंडूच्या पत्नीचे काही वर्षापूर्वी निधन झाले. त्याला एक मुलगा, एक मुलगी आहे. या दोघांचेही पालन पोषण हरिदास मेश्रामच करीत होते. मात्र बंडू दारूच्या पूर्ण आहारी गेला होता. नेहमी घरी येऊन दारूच्या नशेत तो धिंगाणा घालत होता. या सर्व प्रकाराने संपूर्ण घर दहशतीत राहत होते. या त्रासाला कंटाळूनच वडिलांनी त्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची माहिती आहे. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी आरोपी हरिदास मेश्रामविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा नोंदविला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The father killed the drunken child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.