बाईचं काळीज...परक्या वृद्धालाही देते बापाची माया !
By Admin | Updated: March 7, 2017 01:22 IST2017-03-07T01:22:15+5:302017-03-07T01:22:15+5:30
पांढरकवड्यातल्या एका वर्दळीच्या रस्त्यावर ७५ वर्षांचा वृद्ध पडलेला.. कमरेचे हाड मोडलेले... लक्ष द्यायला कुणीच नाही..

बाईचं काळीज...परक्या वृद्धालाही देते बापाची माया !
संवेदनेची चित्तरकथा : हाड मोडलेल्या अवस्थेत दोन महिने रस्त्यावर बेवारस, भिक्षेत मिळालेले अन्नही मुक्या जीवांना वाटले
अविनाश साबापुरे यवतमाळ
पांढरकवड्यातल्या एका वर्दळीच्या रस्त्यावर ७५ वर्षांचा वृद्ध पडलेला.. कमरेचे हाड मोडलेले... लक्ष द्यायला कुणीच नाही.. आजूबाजूला कुत्रे आणि डुकरांची गर्दी... कुणी तरी भाकरीचा तुकडा टाकला तर खायचा आणि पाणी पाणी करत राहायचे... गेल्या दोन महिन्यांपासून त्याची ही तगमग अनेकांनी पाहिली. प्रत्येकाने बेवारस म्हणून दुर्लक्ष केले. अखेर या तडफडणाऱ्या वृद्धासाठी तीन मायलेकींचे हृदय द्रवले. जे काम मर्दांनी केले नाही, ते या मायमाऊल्यांनी केले. त्याला यवतमाळच्या दवाखान्यात आणले. पण इथे कहाणी संपली नाही, इथूनच सुरू झाला संघर्ष ...
त्याला पत्नी नाही, संसार असण्याचा प्रश्नच नाही. पांढरकवड्यात ‘कवडू’ हीच त्याची सार्वजनिक ओळख. दुकानांमध्ये काही तरी मागायचे, थोडे खायचे आणि बरेचसे मोकाट कुत्र्यांना खाऊ घालायचे, हा त्याचा शिरस्ता. सुराणा जिनिंगच्या आडोशाने तो राहायचा. पण दोन महिन्यांपूर्वी तो पडला. कमरेचे हाड तुटले. अशा अवस्थेत तो महिला समाज शाळेलगतच्या वाचन केंद्राजवळ पडून होता. कण्हत होता. जागेवरून उठणेच शक्य नसल्याने भिख मागून जेवायची सोय नव्हती. मलमूत्र विसर्जन जागच्या जागीच. रस्त्याचे वाटसरू त्याच्याकडे पाहून नाक मुरडत. कुणी दुरूनच काहीतरी खायला टाकून जायचे. तब्बल दोन महिने अंगभर वेदना सोसत तो भणंग पडलेला होता.
माणसं हातचं राखून वागत असताना अखेर एक माऊलीनेच मर्द बाणा दाखविला. अंगणवाडीसेविका असलेल्या माया मडावी यांनी ‘कवडू’शी संवाद साधला. पण तो काहीसा विमनस्क असल्याने माहितीच देऊ शकला नाही. शेवटी मायाबार्इंनी आपल्या दोन मुली नम्रता आणि दुर्गा यांना बोलावून वृद्ध कवडूचा काही उपचार करता येईल का, याचा वेध घेतला. यवतमाळचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. येलनारे दर रविवारी पांढरकवड्यात भेट देतात. त्यांच्याकडे कवडूला नेण्याचे तिन्ही मायलेकींनी ठरवले. सर्वात प्रथम नाव्ह्याला बोलावून कवडूची ‘कटिंग’ करवून घेतली. त्याला स्वच्छ आंघोळ घालून दिली. कवडूला नीटनेटके कपडे घालून मागील रविवारी तिन्ही मायलेकींनी डॉ. येलनारे यांची भेट घेतली. मात्र, गंभीर इजा असल्याने कवडूला यवतमाळात आणा. त्याच्या आॅपरेशनचा खर्च मी घेणार नाही. फक्त औषधांचा खर्च तुम्ही करा, असे डॉक्टरांनी सांगितले.
मायलेकींनी कवडूच्या उपचाराचा चंगच बांधला. त्यांनी पांढरकवड्यातील ६० वर्षीय हरीप्रसाद शर्मा या सामाजिक जाणिवेच्या व्यक्तीचे सहकार्य घेत कवडूला सोमवारीच यवतमाळात आणून डॉ. येलनारे यांच्या दवाखान्यात अॅडमिट केले. मात्र इन्फेक्शन भरपूर असल्याने लगेच आॅपरेशन शक्य नव्हते. मात्र उपचारानंतर कवडू आता व्यवस्थित आहार घेऊ शकत आहे. तीन दिवसानंतर कवडूला जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर २२ मध्ये ‘शिफ्ट’ करण्यात आले. पण दोन-चार दिवस झाल्यावर आता रूग्णालयीन कर्मचाऱ्यांची कुरकुर सुरू झाली आहे. ‘याला जिथून आणले तेथेच घेऊन जा. याचे आॅपरेशन होऊ शकत नाही. याच्यामुळे एक बेड गुंतला आहे. हा माणूस विमनस्क आहे. त्याचा इतर पेशंटला त्रास होत आहे...’ असे म्हणत कवडूला परत पांढरकवड्यात नेण्यास सांगितले जात आहे. पण, माणुसकीच्या नात्याने त्याच्यावर उपचार करू पाहणाऱ्या मायलेकी त्याला आॅपरेशनविना परत नेण्यास तयार नाही. पांढरकवड्याचे हरीप्रसाद शर्मा रोज येऊन कवडूचे घाण कपडे बदलून देतात. मळके कपडे सोबत नेतात. पांढरकवड्याच्या नदीवर धुऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी आणतात.
माया मडावी, नम्रता मडावी, दुर्गा मडावी या मायलेकींसह हरीप्रसाद शर्मा कवडूसाठी जिवाचे रान करीत आहे. आता आॅपरेशन होणे आणि एखाद्या वृद्धाश्रमात कवडूची तजविज होणे, एवढीच अपेक्षा अर्धवट आहे.
अचानक दुखावले ‘दूरचे नातेवाईक’
‘कवडू’ हे व्यक्तिमत्त्व पांढरकवड्यात अनेकांना अनेक वर्षांपासून परिचित आहे. उघडा नागडा देह. पिंजारलेले केस. अशा अवस्थेत घरोघरी फिरणारा कवडू अनेकांनी आपल्या बालपणी पाहिला. त्याला दगड मारून पळण्याचा ‘खेळ’ही अनेकांनी केला. तोच कवडू आता वृद्धत्वाने जर्जर झाला, तेव्हा त्याच्या दिमतीला कोणीच नाही. तीन मायलेकींनी त्याला दवाखान्यात आणले, तेव्हा मात्र कवडूचे ‘दूरचे नातेवाईक’ अचानक पुढे आले अन् ‘तुम्ही हे बरे केले नाही’ म्हणून या मायलेकींनाच ठणकावून गेले. पण मायलेकी खंबीर आहेत. अशा नातेवाईकांना भीक न घालता रुग्णालयातच कवडूवर उपचार करण्याचा त्यांचा निर्धार आहे.