भाग्य मशीन बंद

By Admin | Updated: October 15, 2014 23:23 IST2014-10-15T23:23:52+5:302014-10-15T23:23:52+5:30

जिल्ह्यातील सात मतदारसंघात लढतीत असलेल्या १०३ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वणी आणि उमरखेड येथे झाले आहे.

Fate machine shutdown | भाग्य मशीन बंद

भाग्य मशीन बंद

१०३ उमेदवार : पार्डी नस्करी, वसंतनगर येथे मतदानाला गालबोट
यवतमाळ : जिल्ह्यातील सात मतदारसंघात लढतीत असलेल्या १०३ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वणी आणि उमरखेड येथे झाले आहे. घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथील मतदान केंद्राबाहेर ग्रामस्थ व पोलिसांत वाद झाला. याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यामध्ये पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्यासह एक कर्मचारी जखमी झाला. तसेच दिग्रस तालुक्यातील वसंतनगर आणि पुसद तालुक्यातील गोपवाडी येथे गालबोट लागले. हे तीन अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.
वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, दिग्रस, पुसद आणि उमरखेड या सात मतदारसंघात बुधवारी मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारामध्ये उत्साह दिसत होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात सकाळच्या टप्प्यात अधिक मतदान झाले. स्वयंस्फूर्तीने मदतान करण्यासाठी नागरिक मतदान केंद्रावर जाताना दिसत होते. निवडणूक आयोगाने दोन हजार ३३६ मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त लावला होता. बंदोबस्तातील मिझोरामचे पोलीस सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले होते. काही ठिकाणी डमी मतपत्रिकेवर असलेल्या रद्दच्या शिक्क्याने संभ्रम निर्माण झाला होता. राळेगाव येथे सायंकाळी ४ पर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद होती. मुक्कामी आलेल्या पोलिंग पार्ट्यांना सोई-सुविधा न मिळाल्याने त्रास सहन करावा लागला. यवतमाळातील मोठे वडगाव परिसरातील शाळेत पिण्याचे पाणी आणि शौचालय नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. (कार्यालय प्रतिनिधी)
वणी, उमरखेडमध्ये सर्वाधिक मतदान
जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदानाच्या टक्केवारीत वणी आणि आर्णीने आघाडी घेतली आहे. या दोन क्षेत्रात ७० टक्के पेक्षा अधिक मतदान झाले आहे. ग्रामीण भागातील मतपेट्या पोहोचण्यास उशीर झाल्याने सायंकाळी ५ नंतर झालेल्या अंतिम मतदानाची सरासरीच निवडणूक विभागाकडून सांगण्यात आली.
नवमतदारांमध्ये उत्साह
जिल्ह्यातील २० लाख २५ हजार ९१८ मतदारांमध्ये १८ ते १९ वयोगटातील २० हजार ३३५ नवमतदार आहे. या मतदारांनीच उत्साहाने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. हे वाढलेल्या टक्केवारीत दिसून येते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून विविध उपक्रमही जिल्हाभर राबविण्यात आले होते.

Web Title: Fate machine shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.