मटका धाडीत वृद्धाचा मृत्यू
By Admin | Updated: January 28, 2015 23:40 IST2015-01-28T23:40:01+5:302015-01-28T23:40:01+5:30
पोलिसांनी एका वरळी मटका अड्ड्यावर धाड घातली. मटका अड्डा चालक पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर, एका वृद्धाशी घटनास्थळी धक्काबुक्की झाली.

मटका धाडीत वृद्धाचा मृत्यू
फौजदाराला ठाण्यात मारहाण : पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात
यवतमाळ : पोलिसांनी एका वरळी मटका अड्ड्यावर धाड घातली. मटका अड्डा चालक पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर, एका वृद्धाशी घटनास्थळी धक्काबुक्की झाली. त्यावेळी या वृद्धाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दरम्यान, येथील शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर या वृद्धाच्या संतप्त मुलाने शहर पोलीस ठाणे गाठले. तसेच गुन्हे शोध पथकाच्या खोलीतच धाड घालणाऱ्या फौजदाराला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर पोलिसांनी याबाबत कमालीची गोपनियता ठेवली. त्यामुळे कारवाईबाबत संशय व्यक्त होत आहे.
सुरेश (प्रकाश) शेटे (६५) रा. संभाजीनगर, असे मृताचे नाव आहे. त्याचा मुलगा संभाजीनगर परिसरात अवैध मटका अड्डा चालवित असल्याची गोपनिय माहिती शहर ठाणेदार दिलीप चव्हाण यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे फौजदार संतोष मनवर यांना सदर मटका अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून पथकाने दुपारी ३ वाजताच्या सुमारास तेथे धाड घातली. यावेळी मटका अड्डा चालक घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
यावेळी तेथे सुरेश शेटे होते. त्यांना पोलिसांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर सुरेश शेटे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे ते खाली कोसळले. ही बाब लक्षात येताच त्यांचे नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले. यावेळी डॉक्टरांनी चाचपणी करून सुरेश शेटे यांना मृत घोषित केले.
वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मुलाने शहर पोलीस ठाणे गाठले. ठाण्याच्या आवारातील गुन्हे शोध पथकाच्या कार्यालयात बसून असलेले फौजदार मनवर यांच्यावर पित्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप त्याने केला. तसेच त्यांना मारहाणही केली. हे पाहून पोलीस कर्मचारी धावून आले. त्यांनी सदर तरुणाला मारहाण केली. त्यानंतर मात्र झटापटीत संधी साधून तो पसार झाल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कारवाईत व्यस्त असल्याचे आणि आरोपींची नावे माहीत नसल्याचे सांगून बोलण्याचे टाळले. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्याकडूनही प्रतिसादाअभावी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र कुणाच्याही अटकेबाबत पोलिसांनी दुजोरा दिला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)