मोरचंडी जंगलातील उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच
By Admin | Updated: January 8, 2017 01:03 IST2017-01-08T01:03:39+5:302017-01-08T01:03:39+5:30
तब्बल ४२ गावांच्या समस्या सुटाव्या, यासाठी नागरिकांनी मोरचंडी जंगलात सुरू केलेले उपोषण शनिवारी चौथ्या दिवशीही कायम होते.

मोरचंडी जंगलातील उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच
दोघांची प्रकृती खालावली : शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली
उमरखेड : तब्बल ४२ गावांच्या समस्या सुटाव्या, यासाठी नागरिकांनी मोरचंडी जंगलात सुरू केलेले उपोषण शनिवारी चौथ्या दिवशीही कायम होते. दरम्यान, दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने नागरिकांचा संताप वाढला. त्यातच शासनाच्या उदासीनतेचा निषेध करीत जंगलातच शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली.
तालुक्यातील बंदी भागातील प्रश्न सातत्याने चर्चेत आहेत. वर्षानुवर्षे त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ४२ गावातील नागरिकांनी थेट जंगलात उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पुन्हा एकदा बंदी भागातील घडामोडींवर खिळले आहे. शनिवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी दोन नागरिकांची प्रकृती खालावली. भारत मेंडके आणि सयाबाई किसन मेंडके अशी त्यांची नावे आहेत. त्यांना उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे तेथून त्यांना नांदेडच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, सातत्याने बंदी भागातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शनिवारी मोरचंडी गावातून शासनाची प्रेतयात्रा काढण्यात आली. यात परिसरातील दीड ते दोन हजार महिला-पुरुष सहभागी झाले. ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा दोन ते अडीच किलोमीटर पायी चालत उपोषणस्थळी जंगलात पोहोचल्यावर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात ४२ गावे आहेत. या बंदी भागात ३० हजारांपेक्षा अधिक नागरिक राहतात.
रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांपासून ते वंचित आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता थेट मोरचंडीच्या जंगलातच नागरिक उपोषणाला बसले आहेत. जेवली, थेरडी, जवराळा, गाडीबोरी, डोंगरगाव, मोरचंडी, सोनदाबी, पिंपळगाव, खरबी या गावातील नागरिक येथे येत आहे. (शहर प्रतिनिधी)