‘वसंत’पुढे शेतकरी, कामगारांचे आंदोलन
By Admin | Updated: November 7, 2015 02:43 IST2015-11-07T02:43:04+5:302015-11-07T02:43:04+5:30
वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम असताना आता ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांनीही वसंत समोर आंदोलन सुरू केले आहे.

‘वसंत’पुढे शेतकरी, कामगारांचे आंदोलन
थकीत रकमेची मागणी : १३ महिन्यांपासून वेतन नसल्याने उपासमारी
उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम असताना आता ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांनीही वसंत समोर आंदोलन सुरू केले आहे.
गतवर्षी वसंत साखर कारखान्यात मार्च ते जून या कालावधित १२ हजार मेट्रिक टन गाळप झाला. या ऊसाची एफआरपीनुसार थकीत बाकी तत्काळ मिळावी या मागणीसाठी वसंतचे माजी संचालक चितांगराव कदम यांनी गुरूवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. कारखाना संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे कारखाना बंद पडण्याच्या वाटेवर आहे. कामगारांचे १३ महिन्यांपासून वेतन थकित आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचेही पैसे थकीत आहे. ४७२ शेतकऱ्यांचे शिल्लक प्रती टन ६०० रुपये प्रमाणे व्याजासह पैसे द्यावे अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. त्यावेळी १५ दिवसात प्रश्न मार्गी लावू असे सांगितले होते. मात्र अद्यापही मागण्यापूर्ण झाल्या नसल्याने चितांगराव कदम यांनी उपोषण सुरू केले आहे.
तर कामगारांनी १३ महिन्याच्या थकीत वेतनासाठी साखळी उपोषण कारखान्यापुढे सुरू केले आहे. गत १३ महिन्यांपासून कामगारांची उपासमार होत असून, कारखाना प्रशासन केवळ आश्वासने देतात. वारंवार आंदोलने करूनही उपयोग झाला नाही. शेवटी शुक्रवारी सकाळी १० वाजता कारखाना प्रवेशव्दारासमोर कामगार संघटनेचे अध्यक्ष पी.के. मुडे यांच्या नेतृत्वात शेकडो कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले.
कारखाना प्रशासनाकडे पाच कोटी ३० लाख रुपये, वाढीव फरक दोन कोटी रुपये, ग्रॅज्युईटीची रक्कम ७५ लाख रुपये देणे आहे. ती सर्व रक्कम तत्काळ द्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. (शहर प्रतिनिधी)