विविध संकटांनी शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: October 22, 2014 23:26 IST2014-10-22T23:26:33+5:302014-10-22T23:26:33+5:30
पावसाने मारलेली दडी, उभे पीक वाळून जाणे, दुबार, तिबार पेरणी आणि युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. त्यातच शेतमाल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

विविध संकटांनी शेतकरी त्रस्त
नांदेपेरा : पावसाने मारलेली दडी, उभे पीक वाळून जाणे, दुबार, तिबार पेरणी आणि युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. त्यातच शेतमाल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या घरात जेवढा पैसा होता, तेवढा मजुरांना वाटप करण्यात गेला आहे़ त्यामुळे आता त्यांच्या घरी एक पैकाही उरला नाही़ यातच खरीप पिकांना फटका बसला. जी पिके निघाली, ती विकायची कुठे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ शेतकरी संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन येण्यास कुणीही पुढाकार घेतला नाही़ नेते मंडळी आत्तापर्यंत विधानसभा निवडणुकीत व्यस्त होती. निकाल लागल्यानंतर आता सर्वांना मुख्यमंत्री कोण होईल, याची चिंता लागली आहे. मात्र शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे, याचे त्यांना काही देणे-घेणे नाही़
आता दिवाळी सण तोंडावर आला आहे. सर्वत्र खरेदी सुरू आहे. मात्र हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ त्यातून मार्ग काढण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून आपल्या जनावरांची विक्री करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता ते जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवित आहेत. बाजारात कवडीमोल दराने जनावरे विक्री करावी लागत आहे़ ज्या जनावरांनी वर्षभर शेतकऱ्यांना साथ दिली, ती जनावरे विकताना त्यांना यातना होत आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या मनात दु:ख आहे, तर दुसरीकडे दिवाळी सण साजरा करायचा असल्यामुळे ते दुविधेत सापडले आहे. या व्दिधा मनस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नेहमी संकटाचा सामना करावा लागतो़ पीक ऐन भरात असताना पावसाने दडी मारल्याने सोयाबिनच्या शेंगा भरल्याच नाही, तर कापसाचे पीक वाळू लागले आहे़ पिकांना लावला एवढा खर्चही निघणे अवघड झाले आहे़ (वार्ताहर)