शेतकऱ्यांचे सव्वा कोटींच्या वर अडकले
By Admin | Updated: August 12, 2014 00:11 IST2014-08-12T00:11:50+5:302014-08-12T00:11:50+5:30
नाफेडच्या वतीने यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर आणि चण्याची खरेदी करण्यात आली. परंतु विक्री केलेल्या शेतमालाचे अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.

शेतकऱ्यांचे सव्वा कोटींच्या वर अडकले
दारव्हा : नाफेडच्या वतीने यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर आणि चण्याची खरेदी करण्यात आली. परंतु विक्री केलेल्या शेतमालाचे अद्यापपर्यंत पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सव्वाकोटीच्या वर रक्कम अडकून पडली असून, त्वरित पैसे मिहावे अशी मागणी आहे.
शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे शेतमालाचीे किंमत मिळावी याकरिता नाफेडकडून यवतमाळ जिल्ह्यात तूर व चन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. दहा हजार ८१९ क्विंटल तूर व आठ हजार ८०० क्विंटल चना खरेदी करण्यात आला. त्यामधील तुरीचे ४ कोटी ६५ लाख २२ हजार ४३१ रुपये आणि दोन कोटी ७१ लाख ८० हजार ९६१ रुपये पेमेंट झाले.
परंतु त्यानंतर तूर विक्री करणाऱ्यांचे एक कोटी १७ लाख ५२ हजार ४३१ व चन्याचे १० लाख ९६१ रुपये अद्यापही देणे बाकी आहे. बाजार समितीच्या नियमानुसार विकलेल्या शेतमालाची रक्कम वजनमाप झाल्याबरोबर किंवा विक्री झाल्याबरोबर त्याच दिवशी दिली पाहिजे असा नियम आहे. परंतु गेल्या तीन-चार महिन्यापासून विकलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही.
यासंदर्भात हरीभाऊ गुल्हाने यांनी आवाज उठविला आहे. त्यांनी कृषी उतपन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघस्तरावर शेतकऱ्यांनी विक्री केलेल्याची रक्कम त्वरित मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अडकलेल्या पैशाबाबत जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडे चौकशी केली असता नाफेडकडून पैसे न मिळाल्यामुळे सव्वाकोटीच्या वर देणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात नाफेडकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)