शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: August 22, 2014 00:08 IST2014-08-22T00:08:03+5:302014-08-22T00:08:03+5:30
सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाचा वाढता बोझा याला कंटाळून एका शेतकरी पूत्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना लगतच्या बेचखेडा येथे घडली. या घटनेने

शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या
बेचखेडा : कर्जापायी मृत्यूला कवटाळले
हिवरी : सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाचा वाढता बोझा याला कंटाळून एका शेतकरी पूत्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना लगतच्या बेचखेडा येथे घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
राजू रामेश्वर मडावी (३३) रा.बेचखेडा असे मृत शेतकरी पूत्राचे नाव आहे. सततच्या नापिकीने त्याच्या वडिलांवर पीक कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. त्यातच वडील आजारी पडल्याने ती जबाबदारी राजूवर येवून पडली. अशातच स्वत:चे आणि भावाचे लग्न कसे करायचे याची चिंता त्याला भेडसावत होती. काही दिवसांपूर्वी त्याने कर्जाचे पुनर्गठन करावे यासाठी बँकेकडे पाठपुरावा केला. मात्र कर्जाच्या पुनर्गठनाला बँकेने नकार दिला. त्यामुळे हताश होवून राजूने १७ आॅगस्टला दुपारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच राजूच्या नातेवाईकांनी त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर बुधवारी २० आॅगस्टला त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
उत्तरीय तपासणीनंतर राजूचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. राजूच्या मागे वृद्ध आई, वडील आणि भाऊ असा आप्त परिवार आहे. राजूच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवाय या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कर्ज पुनर्गठनास नकार देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही मृत राजूच्या कुटुंबीयांनी केली आहे. (वार्ताहर)