आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

By Admin | Updated: July 9, 2016 02:37 IST2016-07-09T02:37:27+5:302016-07-09T02:37:27+5:30

मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, कृषि विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे

Farmers response to the Awalgaon Pattern | आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

देशी कापूस उत्पादनाचा उपक्रम : झरी तालुक्यातील ५० आदिवासी कुटुंबांना बियाणे वाटप
यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, कृषि विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे बिगर बीटी देशी कापूस बियाणे उत्पादनाचा अभिनव कार्यक्रम ११३ आदिवासी शेतकऱ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. झरी तालुक्यातील ५० आदिवासी कुटुंबांना देशी कापूस बियाणे वाटप करण्यात आले असून या आवळगाव पॅटर्नला शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या प्रयत्नातून झरी तालुक्यातील हिवरा बा., कटली बोरगाव, पालगाव, बोटोनी, पाचपोर या गावातील ५० शेतकऱ्यांनी बिगर बीटी कापूस बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्याचा मानस दर्शविला. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सी. यू. पाटील यांनी बिगर बीटी बियाणे उपलब्ध करून दिले. कृषी दिनाचे औचित्य साधून पांढरकवडा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात तिवारी यांच्या हस्ते बिगर बीटी कापूस बियाणे वाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
तिवारी यांनी पारंपरिक शेतीचा आवळगाव पॅटर्न राज्यभर राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. क्षेत्रात कापसाच्या बीटी बियाण्याचा वापर, कृषीनिविष्ठेकरिता बाजारावरील अवलंबित्व यामुळे शेतीतील नफा कमी होत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वावलंबी शाश्वत शेतीची कास धरून, वाटप करण्यात आलेल्या बियाण्यातून बियाणे उत्पादित करून, गावात देशी कापसाची बियाणे बँक उभारण्याचे आवाहन केले.
पांढरकवडा येथील उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी अतिघनता कापूस लागवड आणि बियाणे उत्पादन कार्यक्रमाविषय माहिती दिली. आजही शेतकरी देशी कापूस बियाणे उत्पादन करण्यास इच्छुक असल्यास त्यांना कृषी विभागामार्फत बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता कृषी विभाग सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही दिली. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय परिसरात तिवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मा आत्राम, मुन्ना बोलेनवार, अंकित नैताम, मोहन जाधव, तंत्र अधिकारी एम. बी. गोंधळी, कृषी अधिकारी सोनाली कवडे, निलेश ओळंबे, कृषी सहायक ए. एच. बोके. गजानन कोरे आदी उपस्थित होते. रोहीत राठोड यांनी सूत्रसंचालन केले.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Farmers response to the Awalgaon Pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.